शिंदेवाडीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ
By Admin | Published: January 30, 2015 12:03 AM2015-01-30T00:03:51+5:302015-01-30T00:16:03+5:30
४० संघाचा सहभाग : ओमसाई, ताराराणी यांची विजयी सलामी
मुरगूड : महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व शिंदेवाडी (ता. कागल) येथील नवजवान तरुण मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या पुरुष व महिला गटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला आज, गुरुवारी शानदार सुरुवात झाली. सर पिराजीराव घाटगे क्रीडा संकुलामध्ये चार मैदानांवर सामने सुरू असून, चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत दोन्ही गटात चाळीस संघानी सहभाग घेतला आहे. उद्घाटनाच्या सामन्यात ओमसाई क्रीडा मंडळ, बोरीवली व ताराराणी स्पोर्टस्, कोल्हापूर यांनी विजयी सलामी दिली.
क्रीडा ज्योत प्रज्वलित करून मिरवणूक क्रीडा संकुलामध्ये आणली. यावेळी क्रीडा ध्वजारोहण वरळी तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब गुजर यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलन सुनीलराज सूर्र्यवंशी, शाहू कारखान्याचे संचालक अमरसिंह घोरपडे, आर. के. पाटील, बिद्रीचे संचालक वसंत पाटील, शाहू दूध संघाचे संचालक संजय पाटील, अनंत फर्नांडीस, विलास गुरव, प्रा. चंद्रकांत जाधव, दिगंबर परीट, रविराज सावडकर यांच्या हस्ते पार पडले.
स्पर्धेचे संयोजक व बिद्री कारखान्याचे संचालक दत्तात्रय खराडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुनीलराज सूर्यवंशी, प्रा. चंद्रकांत जाधव, दिगंबर परीट, रविराज सावडकर यांनी मनोगत व्यक्त केले. रामचंद्र खराडे यांनी आभार मानले.
दरम्यान, क्रीडांगण एकवर झालेला महिलांचा सामना ताराराणी, कोल्हापूर या संघाने एकहातीच जिंकला, मध्यंतरापर्यंत या संघाने आजरा महाविद्यालयाच्या संघावर ३९-०७ अशा गुण फरकांनी तब्बल ८२ गुणांची आघाडी घेतली होती. ताराराणीकडून राष्ट्रीय खेळाडू अरुणा सावंत, शुभदा माने, पूजा पाटील यांनी उत्कृष्ट चढाया केल्या. आजरा संघाकडून वर्षा साबळे, भाग्यश्री पाटील, सोनाली होलम यांंनी ताराराणीचे आक्रमण थोपवण्याचा प्रयत्न केला; पण शेवटी ५१-१३ अशा अंतिम गुणांनी ताराराणी संघाने हा सामना जिंकून विजयी सलामी दिली.
पुरुष गटामध्ये ओमसाई, बोरीवली या संघाने पहिल्यापासूनच सामन्यावर चांगली पकड ठेवली होती. या संघातील किरण घाटगे, कुलदीप माईनकर, ओंकार रुंदाणे, प्रथमेश मांजरेकर या खेळाडूंनी चांगला खेळ केल्याने मध्यंतरापर्यंत युवा स्पोर्टस्, आणजे संघाला केवळ १ गुणच मिळवता आला. तब्बल १७ गुणांची आघाडी घेतलेल्या बोरीवलीच्या खेळाडूंना रोखण्यासाठी आणाजेच्या सतीश जाधव, विनायक पाटील, महेश जाधव, मोहन पाटील या खेळाडूंनी प्रयत्न केला; पण शेवटी २४ गुणांनी ओमसाई, बोरीवली या संघाने हा सामना जिंकत विजयी सलामी दिली. रात्री उशिरापर्यंत चारही मैदानावर सामने सुरू होते.
सामान्यांना प्रो-कबड्डीचाच रंगढंग
शिंदेवाडी या छोट्याशा गावात सामने भरवल्याने खेळाडू व प्रशिक्षकांनी मंडळाचे कौतुक केले. अगदी प्रो-कबड्डी सामन्याच्या मैदानाला लाजवेल अशी मैदाने, आकर्षक व्यासपीठ, प्रेक्षकांसाठी मोठ्या गॅलरी या सर्वांमुळे सर पिराजीराव घाटगे क्रीडानगरी सजली आहे.
मुरगुड येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी सामन्यातील क्षण.