कोल्हापुरात कोव्हॅक्सिन लस देण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:20 AM2020-12-23T04:20:38+5:302020-12-23T04:20:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य शासनाकडून लस देण्यास परवानगी मिळाल्याने मंगळवारी येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य शासनाकडून लस देण्यास परवानगी मिळाल्याने मंगळवारी येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. दिवसभरामध्ये सहाजणांना लस टोचण्यात आली आहे. अशा पद्धतीने एक हजार स्वयंसेवकांना लस टोचण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी या परवानगीचा मेल महाविद्यालयाच्या प्रशासन विभागाला प्राप्त झाला.
यासाठी भारत बायोटेककडून १०० स्वयंसेवकांना देण्यासाठी लस उपलब्ध करून देण्यात आली आहेत. संस्थेने सुरू केलेल्या पोर्टलवर स्वयंसेवकांची नोंदणी करण्यात आली होती. ती अजूनही सुरू आहे. या सर्व स्वयंसेवकांना लसीकरण झाल्यानंतर पुन्हा नंतर त्यांची आरोग्य तपासणी केली जाईल आणि मग तुलनात्मक अभ्यासानंतर निष्कर्ष काढण्यात येतील.
३१ डिसेंबरपर्यंतचे नियोजन
वास्तविक, ही प्रक्रिया ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. मात्र, शासनाच्या आरोग्य विभागाकडून वेळेत परवानगी न मिळाल्याने आता कालावधी वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. दिवसाला १०० जणांना लस देण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक प्रशिक्षित डॉक्टर आणि अन्य स्टाफही तयार ठेवण्यात आला आहे.