कोल्हापूरसाठी वंदे भारत सुरू करा, खासदार धनंजय महाडिक यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 12:53 PM2024-07-02T12:53:09+5:302024-07-02T12:53:40+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर - मुंबई रेल्वे मार्गावरील प्रवाशांची मोठी गर्दी विचारात घेऊन लवकरात लवकर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करावी, ...

Start Vande Bharat for Kolhapur, MP Dhananjay Mahadik demands to Railway Minister | कोल्हापूरसाठी वंदे भारत सुरू करा, खासदार धनंजय महाडिक यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूरसाठी वंदे भारत सुरू करा, खासदार धनंजय महाडिक यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर - मुंबई रेल्वे मार्गावरील प्रवाशांची मोठी गर्दी विचारात घेऊन लवकरात लवकर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सोमवारी भेट घेऊन केली.

कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असल्याने येथून ये-जा करणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांना प्रवासी मोठ्या संख्येने असतात. त्यामुळेच वंदे भारत एक्स्प्रेसची या ठिकाणी गरज आहे. तसेच कोल्हापूर स्थानकावरून सुटणाऱ्या बहुतेक सर्व रेल्वेगाड्या वळिवडे आणि रुकडी या स्थानकांवर पूर्वी थांबत असत. मात्र, कोरोना काळात हे थांबे रद्द झाले आहेत. शेकडो प्रवाशांची सोय लक्षात घेऊन, ते पूर्ववत सुरू करावेत, अशीही मागणी निवेदनातून केली आहे.

रेल्वेचा पुणे विभाग मनमाडपर्यंत विस्तारित केल्यास कोल्हापूरहून शिर्डी साईनगरपर्यंत एखादी विशेष रेल्वे सुरू करता येईल. त्यातून हजारो भाविकांना मोठी सुविधा निर्माण होईल. सध्या मिरज ते परळी या मार्गावर डेमो ट्रेन सुरू आहे. ही गाडी कोल्हापुरातून सुरू करावी, कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणाऱ्या कोयना एक्स्प्रेसमध्ये चार जनरल डबे वाढवावेत, कोल्हापूर ते सांगलीदरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेचे आधुनिकीकरण करावे, अशा मागण्याही महाडिक यांनी केल्या आहेत. 

सध्या कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते धनबाद या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या कोल्हापुरात आल्यावर सुमारे ४८ तास थांबून असतात. अशावेळी या रेल्वे गाड्या, सोलापूर किंवा कलबुर्गी मार्गावर सोडता येतील का, याचाही रेल्वे प्रशासनाने सकारात्मक विचार करावा, अशी सूचना महाडिक यांनी केली आहे.

Web Title: Start Vande Bharat for Kolhapur, MP Dhananjay Mahadik demands to Railway Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.