रिक्षाचालकांकरीता कल्याणकारी महामंडळ त्वरित सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 04:24 PM2020-08-11T16:24:36+5:302020-08-11T16:27:44+5:30
तीन आसनी रिक्षाकरिता कल्याणकारी महामंडळ, विमा कवच आदी मागण्या त्वरित मान्य करून त्याची कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन कॉमन मॅन तीन आसनी रिक्षा संघटनेने सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांना दिली.
कोल्हापूर : गेली चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्रामध्ये तीन आसनी रिक्षा या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक प्रमुख घटक बनल्या आहेत. त्यांच्याकरिता कल्याणकारी महामंडळ, विमा कवच आदी मागण्या त्वरित मान्य करून त्याची कार्यवाही करावी. या मागणीचे निवेदन कॉमन मॅन तीन आसनी रिक्षा संघटनेने सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांना दिली.
राज्यातील लाखो रिक्षा प्रवासी यांना अहोरात्र सेवा देत आहेत. परंतु हा घटक नेहमी शासनाकडून दुर्लक्षित राहिला आहे. रिक्षा टॅक्सी क्रांती संघर्ष कृती समिती (महाराष्ट्र राज्य) यांच्यावतीने राज्यभरातील तीन आसनी रिक्षाचालकांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात म्हणून रविवार(दि. ९)पासून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी कॉमन मॅनने या आंदोलनास पाठिंबा म्हणून साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गाजरे यांना निवेदन दिले.
घोषित केलेल्या रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करावी. आत्महत्याग्रस्त रिक्षाचालकांच्या वारसांना तत्काळ १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्या. रिक्षाचालकांना कोविड योद्धा म्हणून ५० लाखांचे विमा कवच द्या. शेतकऱ्यांप्रमाणे रिक्षाचालकांचे सरसकट कर्ज माफ करावे
रिक्षाचालकांना दिल्ली, कर्नाटक, व आंध्र सरकारच्या धर्तीवर दरमहा पाच हजार रुपये तातडीची मदत द्या या मागण्यांचा समावेश आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
यावेळी कॉमन मॅनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. बाबा इंदुलकर, जिल्हाध्यक्ष-अविनाश दिंडे, उपाध्यक्ष जाफर मुजावर, सचिव श्रीकांत पाटील, संजय भोळे, खजानिस नरेंद्र पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते.