‘क्लीन चिट’ची एक खिडकी योजना सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:13 AM2018-04-12T01:13:36+5:302018-04-12T01:13:36+5:30
कोल्हापूर : भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे दिले; परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी ‘क्लीन चिट’ देण्याची एक खिडकी योजना सुरू केली असल्याची खरमरीत टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.
बुधवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या विखे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील सद्य:स्थितीवर कोरडे ओढले. ते म्हणाले, अहमदनगरचा प्रकार
हा पूर्ववैमनस्यातून असला तरी निषेधार्ह आहे. त्याचे समर्थन कुणी करणार नाही.
मात्र त्यामध्ये राजकीय सूडबुद्धीने कारवाई होता कामा नये. पोलीस अधिकाºयांच्या हातात अधिकार राहिले नसून, ते सरकारच्या हातातील बाहुले झाले आहेत. राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही.
जिल्हा पोलीसप्रमुखांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रकार धक्कादायक असून, विशेष पथकाद्वारे या प्रकाराची चौकशी व्हावी.
शिवसेनेचा समाचार घेताना विखे-पाटील म्हणाले, एकीकडे मुंबईत महापालिकेमध्ये सत्ता असताना ज्या दुर्घटना घडल्या, तेथे कोणतीही कारवाई करायची नाही आणि दुसरीकडे अहमदनगरला जेव्हा काही होते तेव्हा कारवाईची मागणी करायची हे दुटप्पी धोरण आहे. शिवसेनेकडून मुंबई, ठाण्यामध्ये केवळ बिल्डरांचे हितसंबंध जोपासत आर्थिक हितसंबंध जपण्याचे काम सुरू आहे. आम्ही सरकारच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली म्हणूनच राज्यात सरकारविरोधी वातावरण तयार झाले आहे. मुंबई महापालिकेवेळी एकमेकांची औकात काढणाºयांची आता बदललेल्या वातावरणामुळे भाषा बदलली आहे. सुरुवातीला ‘एकला चलो रे’ची भाषा बोलणारे भाजपचे नेते आता शिवसेनेला युतीचे आवाहन करीत आहेत.
जागरण यात्रेची कोल्हापुरातून सुरुवात
केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराविरोधात महाराष्ट्रात जागरण यात्रा काढण्यात येणार आहे. कोल्हापुरातूनच या यात्रेची सुरुवात करण्याचे नियोजन असून त्यासाठी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना येण्याची विनंती केली आहे. अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीकडे हा प्रस्ताव गेला असून, लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होईल. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात ही यात्रा नेली जाणार आहे, असे विखे-पाटील यांनी सांगितले.