‘थेट पाईपलाईन’ चे काम तात्काळ सुरु करा, अन्यथा कार्यालयात बसू देणार नाही :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2017 05:44 PM2017-05-11T17:44:56+5:302017-05-11T17:44:56+5:30

सर्व पक्षीय कृती समितीचा इशारा

Start the work of 'Direct Pipeline' immediately, otherwise you will not be allowed to work in the office: | ‘थेट पाईपलाईन’ चे काम तात्काळ सुरु करा, अन्यथा कार्यालयात बसू देणार नाही :

‘थेट पाईपलाईन’ चे काम तात्काळ सुरु करा, अन्यथा कार्यालयात बसू देणार नाही :

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. ११ : थेट पाईपलाईन योजना ही कोल्हापूरकरांची अस्मिता असून या योजनेत झालेल्या भ्रष्टाचारास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करतानाच बुधवारी शिवसेनेने बंद पाडलेले काम तात्काळ सुरु करावे अन्यथा अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही, असा इशारा गुरुवारी येथील सर्व पक्षीय कृती समितीने महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत दिला. अध्यक्षस्थानी महापौर हसीना फरास होत्या.

भ्रष्टाचारास पाठीशी घालण्याचा कोणीही प्रयत्न करु नये. ज्यांना या योजनेत आंबे पाडले त्यांचा पर्दाफाश झाला पाहिजे. अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. थेट पाईपलाईन योजना पंचवीस वर्षाच्या संघर्षानंतर मंजूर झालेली आहे. योजनेचे पाणी कोल्हापूरकरांना मिळालेच पाहिजे. ज्या त्रुट आहेत त्या दूर करुन काम दर्जेदार झाले पाहिजे. दुर्दैवाने ज्या गतीने काम पूर्ण व्हायला पाहिजे तेवढ्या गतीने ते होत नसल्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी सांगितले.

योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आहेत, त्यामुळे काहींनी त्याचे काम बंद पाडले आहे. काम बंद राहिले तर पुन्हा कोल्हापूरकरांचेच नुकसान होईल, त्यामुळे तात्काळ कामाला सुरवात करावी. प्रसंगी जेथे काम बंद पाडले आहे, त्याठिकाणावर यायला आम्ही तयार आहोत. पण मनपा अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेऊन योजनेचे काम सुरु करावे, असेही पोवार यांनी स्पष्ट केले. माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांनीही उद्याच्या उद्या काम सुरु करा,अशी मागणी केली.

यावेळी उपायुक्त विजय खोराटे यांनी योजनेच्या कामाचा आढावा घेतला. आॅगस्ट २०१४ मध्ये कामाची वर्कआॅर्डर दिली असली तरी विविध खात्याच्या परवानगी मिळण्यात अडथळे आल्याने योजनेचे काम रेंगाळले. ज्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आहे. त्या कामाचे लमसम अंदाजपत्रक केल्यामुळे कमी कामाचे जादा बील दिले गेले. परंतु यापुढे जेवढे काम झाले त्याचे मोजमाप करुनच बील देण्यात येणार आहे, असे खोराटे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेने काम बंद पाडण्याचे जे आंदोलन केले त्यात तथ्थ आहे. जर परवानगीच मिळालेल्या नसतील तर मग कामाला का सुरवात केली असा सवाल बाबा पार्टे यांनी विचारला. प्रशासनाने परवानगी मिळविण्याकरीता वेळोवेळी बैठका का घेतल्या नाहीत, राज्यकर्त्यांच्या निदर्शनास का आणले नाही, असे किशोर घाडगे यांनी विचारले. झालेल्या भ्रष्टाचारावर कोणी पांघरुन घालत असेल तर खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी लाला गायकवाड, दिलीप पवार, नामदेव गावडे, सुरेश जरग, सुभाष देसाई आदींनी चर्चेत भाग घेतला.

गोंगाणेमुळेच प्रकार उघडकीस

ठिकपुर्ली येथील ब्रीजच्या कामाचा प्रत्यक्ष खर्च २२ ते २५ लाखाचा असताना ठेकेदाराला २ कोटी ४८ लाख रुपये देण्यात येणार आहेत. त्यापैकी १ कोटी ४९ लाख रुपये बील अदा केले. अंदाजपत्रकातील मोठी चुक कनिष्ठ अभियंता गोंगाणे यांच्या लक्षात आली. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे होणाऱ्या भ्रष्टाचारास चाप लागला आहे, अशी माहिती माजी नगरसेवक आदिल फरास यांनी यावेळी दिली.

राजकारण नको, योजना पूर्ण करा

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी योजनेच्या कामाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. संयुक्त बैठक बोलवावी म्हणून आम्ही त्यांना विनंती करत आलो आहे. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. राज्य व केंद्र सरकारने ताकद दिल्यावरच ही योजना चांगल्या प्रकारे पूर्ण होईल. म्हणूनच यात राजकारण नको, योजना बरबाद होईल असे कोणी करु नये. ती दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी पालकमंत्र्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन फरास यांनी केले.

शिवसेनेसोबत आज बैठक

आयुक्त बाहेर गावी गेले असल्याने गुरुवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करता आलेली नाही, मात्र आज, शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता शिवसेना पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली जाईल, अशी माहिती महापौर हसीना फरास यांनी यावेळी दिली. तांत्रिक अडचणीमुळे आधीच कामाला उशिर झाला आहे. आणि आंदोलनामुळे काम बंद राहू नये. काम सुरु करण्यास सहकार्य करावे अशी विनंती शिवसेनेला केली जाईल. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल, असेही महापौर म्हणाल्या.

 

Web Title: Start the work of 'Direct Pipeline' immediately, otherwise you will not be allowed to work in the office:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.