माजगाव-खोतवाडी रस्त्याचे काम सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:21 AM2021-04-12T04:21:41+5:302021-04-12T04:21:41+5:30
पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील माजगाव-खोतवाडी रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून निधी मंजूर होऊन सुद्धा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ...
पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील माजगाव-खोतवाडी रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून निधी मंजूर होऊन सुद्धा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. रस्त्याचे काम त्वरित सुरू करा, अशी मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दगडू गुरवळ आणि रामचंद्र खोत (खोतवाडी) यांनी केली.
या रस्त्याने माजगाव, माळवाडी, खोतवाडी, देवठाणे, शिंदेवाडी, कसबा ठाणे आदी गावांतील प्रवाशांची दररोज ये-जा असते. गेल्या १२ वर्षांपासून रस्त्याचे खडीकरण किंवा डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्याच्या कामासाठी वारंवार पाठपुरावा करून निधी मंजूर झाला आहे; परंतु वर्कऑर्डर नसल्याने संबंधीत ठेकेदाराने काम सुरू केलेले नाही. रस्त्याची दयनीय अवस्था पाहता, पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.