चित्रनगरीत नव्या वर्षात चित्रीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:54 AM2018-01-01T00:54:03+5:302018-01-01T00:54:42+5:30
इंदुमती गणेश ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : चित्रनगरीची पहिल्या टप्प्यातील विकासकामे पूर्ण झाली असली तरी मुख्यमंत्र्यांची तारीख न मिळल्याने चित्रनगरीचे उद्घाटन झालेले नाही. आता मात्र उद्घाटनाची वाट न पाहता येथे नव्या वर्षात प्रत्यक्ष चित्रीकरणाला प्रारंभ होणार असून ९ तारखेपासून ‘लाईट, कॅमेरा, अॅक्शन, सायलेन्स’चा आवाज घुमणार आहे.
‘चित्रपटसृष्टीची गंगोत्री’ असलेल्या कोल्हापुरातील शालिनी स्टुडिओ जमीनदोस्त झाला, जयप्रभा स्टुडिओलाही टाळे लागले आहे. त्यामुळे कोल्हापूर चित्रनगरी हे येथील चित्रपट व्यावसायिकांसाठी आशेचा किरण आहे. या चित्रनगरीच्या पुनरूज्जीवन विकासकामांना गेल्यावर्षी सुरुवात झाली. आर्किटेक्चर इंद्रजित नागेशकर यांच्या संकल्पनेतून साकारले जात असलेल्या या कोल्हापूर चित्रनगरीची पहिल्या टप्प्यातील विकासकामे आता पूर्ण झाली आहेत. पहिल्या टप्प्यातील १२ कोटींमध्ये मुख्य इमारतीसह पाटलाचा वाडा या दोन्ही ठिकाणी मिळून जवळपास ३२ लोकेशन्स साकारण्यात आले आहेत. दरम्यान, काही कलाकार व तंत्रज्ञांनी चित्रनगरीच्या लोकेशन्समध्ये सुधारणा सुचविल्या होत्या तसेच काही सुविधांची मागणी केली होती. त्यांचा विचार करून या सुधारणांसाठी वाढीव ५६
लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांचे टेंडरही काही दिवसांत काढण्यात येणार आहे.
चित्रनगरी साकारून दोन महिने होत आले. मागील महिन्यात चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी डिसेंबरमध्ये चित्रनगरीचे उद्घाटन होईल, असे जाहीर केले होते. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या चित्रनगरीचे उद्घाटनही तितक्याच जंगी पद्धतीने व्हावे अशी चित्रपट व्यावसायिकांची व स्थानिक राजकीय नेत्यांची इच्छा आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. या कालावधीत दोनवेळा मुख्यमंत्री कोल्हापुरात आले मात्र वेळेअभावी निघून गेले. नंतर हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने उद्घाटनाची चर्चाच थांबली. त्यामुळे या उद्घाटन सोहळ््याची वाट न पाहता येथे एका मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. पंधरा ते वीस दिवसांचा हा कालावधी असणार आहे.
अनेक कंपन्यांकडून तयारी
मुंबईतील निर्मात्यांनी चित्रनगरीत चित्रीकरण करावे यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडूनदेखील प्रयत्न सुरू आहेत. काही दिग्दर्शकांना येथील लोकेशन्सही आवडली आहेत. चित्रपटांपेक्षा मालिकेच्या चित्रीकरणाचा कालावधी जास्त असतो त्यामुळे मालिकांना प्राधान्य देण्याचा विचार आहे. त्यासाठी काही मालिकांच्या टीमने येथे येण्यास तयारी दर्शविली आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी दिली.
साहित्याचा पुरवठा स्थानिक व्यावसायिकांकडून
चित्रनगरीत लोकेशन्स साकारली असली तरी तेथे चित्रीकरणासाठी लागणारे कॅमेरे व अन्य साहित्य नाही. मात्र, कोल्हापुरात चित्रपट व्यावसायिकांची संख्या मोठी असल्याने येथे स्पॉटबॉयपासून ते सहकलाकार, मॉब कलाकार, तंत्रज्ञासह चित्रीकरणाचे सर्व साहित्य मुंबई, पुण्याच्या तुलनेत कमी खर्चात उपलब्ध आहे. चित्रपटाच्या टीमने फक्त कलाकार आणि कॅमेरा सोबत आणायचा आहे. यामुळे स्थानिक व्यावसायिकांना रोजगार मिळणार आहे.
चित्रपट व्यावसायिकांनी चित्रनगरीच्या लोकेशन्समध्ये सुधारणा सुचविल्या होत्या. त्यासाठी वाढीव ५६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांचे टेंडरही काही दिवसांत काढण्यात येणार आहे. मात्र, उद्घाटनाची वाट न पाहता ९ तारखेपासून येथे एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होत आहे.
- इंद्रजित नागेशकर, आर्किटेक्ट