गुड न्यूज : यंदा शेतकऱ्यांची दिवाळी दणक्यात.. प्रोत्साहन अनुदान आजपासून जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 11:36 AM2022-10-14T11:36:43+5:302022-10-14T11:52:22+5:30

पहिल्या टप्प्यात एक लाख २९ हजार ६० शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळणार आहे.

Starting from Thursday, more than Rs 50,000 subsidy will be credited to the accounts of farmers who have regularly repaid crop loans | गुड न्यूज : यंदा शेतकऱ्यांची दिवाळी दणक्यात.. प्रोत्साहन अनुदान आजपासून जमा

गुड न्यूज : यंदा शेतकऱ्यांची दिवाळी दणक्यात.. प्रोत्साहन अनुदान आजपासून जमा

googlenewsNext

कोल्हापूर : पीक कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अधिकाधिक ५० हजारांपर्यंतचे अनुदान जमा होण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजता आधार प्रमाणीकरण केलेल्या जिल्ह्यातील १२ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. पहिल्या टप्प्यात एक लाख २९ हजार ६० शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळणार आहे. आधार प्रमाणीकरण करताच खात्यावर पैसे जमा होणार आहेत. या शेतकऱ्यांना सरासरी ३० हजारांचा लाभ झाला तरी ३८७ कोटी रुपये जिल्ह्याच्या अर्थकारणात येऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी दणक्यात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सुमारे ४० शेतकरी पात्र ठरतील असा सहकार विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे एकूण पावणेदोन लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होऊ शकतो.

महाविकास आघाडी सरकारने २०१९ मध्ये शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेतून नियमित पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देय होते. सहकार विभागाने या योजनेंतर्गत निकषानुसार २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षात नियमित परतफेड केलेल्या तीन लाख १९ हजार ८०३ शेतकऱ्यांची नावे शासनाच्या महापोर्टलवर अपलोड केली. यातील पात्र पहिल्या टप्प्यातील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १ लाख २३ हजार ७०५, राष्ट्रीयीकृत बँकांचे ५ हजार ५५४ असे एकूण १ लाख २९ हजार २६० शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ५० हजारपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान जमा होणार आहे. यासाठी सेवा केंद्रावर जाऊन संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या नावासमोर ‘अंगठा’ दाबून आधार प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक आहे.

सर्वाधिक करवीर तालुक्यातील

पहिल्या टप्प्यात अनुदानाची रक्कम मिळणाऱ्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय संख्या अशी :

  • करवीर : २०६७८,
  • शिरोळ : १४७१५,
  • चंदगड : १२८५२,
  • कागल : १२८४७,
  • हातकणंगले : १२०८६,
  • राधानगरी : ११७०६,
  • पन्हाळा : ११५२९,
  • गडहिंग्लज : ९५९४,
  • भुदरगड : ८९०७,
  • आजरा : ८११७.
  • शाहूवाडी : ३८३८,
  • गगनबावडा : २२७०,
  • कोल्हापूर शहर : १२१,


पैसे घेतल्यास कारवाई

पात्र लाभार्थींनी महा ई सेवा केंद्र, सीएससी सेंटर, आपले सरकार केंद्र येथे आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. आधार प्रमाणीकरणासाठी आधार कार्ड, मोबाईल घेऊन जावे, असे आवाहन सहकार प्रशासनाने केले. आधार प्रमाणीकरण मोफत करावयाचे आहे. यासाठी पैसे घेतल्यास संबंधित केंद्र चालकावर कारवाई होणार आहे.

इन्कमटॅक्स भरल्यास अपात्र

इन्कमटॅक्स भरलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही. मात्र, इन्कमटॅक्स भरण्याइतपत उत्पन्न नाही; पण बँक कर्ज व विविध कारणांसाठी आयटी रिटर्न भरलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळणार आहे.

पहिला शेतकरी टाकळीवाडीचा

पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर होताच तातडीने आधार प्रमाणीकरण केलेला शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडीचा शेतकरी अनुदानाचा पहिला मानकरी ठरला. पहिल्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी सेवा संस्था, ग्रामपंचायत, राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखेत लावणे सहकार विभागाने बंधनकारक केले आहे.

यांना लाभ नाही

इन्कमटॅक्स भरणारे, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य व आमदार, खासदार, सरकारी नोकरांना प्रोत्साहनचा लाभ मिळणार नाही. पात्र असूनही पहिल्या आणि अंतिम पात्र यादीत नाव नसेल तर संबंधितास सहकार विभागाकडे दाद मागता येणार आहे.

प्रोत्साहन अनुदानासाठी पहिल्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर तातडीने प्रोत्साहनची रक्कम खात्यावर जमा होणार आहे. आधार प्रमाणीकरण मोफत आहे. यासाठी पैसे देण्याची गरज नाही. - अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर

Web Title: Starting from Thursday, more than Rs 50,000 subsidy will be credited to the accounts of farmers who have regularly repaid crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.