‘कलानिकेतन’च्या वार्षीक कलाप्रदर्शनास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:42 PM2020-01-29T12:42:06+5:302020-01-29T12:43:44+5:30
कोल्हापूर येथील रा. शी. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयाच्या ६० व्या वार्षीक कलाप्रदर्शनास मंगळवारपासून प्रारंभ झाला. शाहू स्मारक भवनच्या कलादालनात संस्थेचे अध्यक्ष जयसिंगराव मोरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
कोल्हापूर : येथील रा. शी. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयाच्या ६० व्या वार्षीक कलाप्रदर्शनास मंगळवारपासून प्रारंभ झाला. शाहू स्मारक भवनच्या कलादालनात संस्थेचे अध्यक्ष जयसिंगराव मोरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
या प्रदर्शनात महाविद्यालयातील फौंडेशन, अप्लाईड आर्ट तसेच आर्ट टिचर डिप्लोमा वर्गातील २00 विद्यार्थ्यांच्या ३00 कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. महाविद्यालयात सुरू असलेल्या अभ्यासक्रमाचे विषय रंग, रेषा, रचना, डिझाईन, मेमरी, काम्पोझिशन, व्यक्तीचित्रणांपासून ते जाहिरात क्षेत्रामध्ये केली जाणारी विविध डिझाईन्स़, कॅलिग्राफी, फोटोग्राफी, टायपोग्राफी, इलस्ट्रेशन याद्वारे विविध माध्यमांतील कलाकृती येथे आहेत.
हाताने केलेल्या कलाकृतींसोबतच येथे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायिक दृष्टिकोनातून केलेली कामे मांडण्यात आली आहेत. तसेच या वर्षीचे राज्य कलाप्रदर्शन औरंगाबाद येथे सुरू असून, यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ५८ कलाकृतींची निवड करण्यात आली आहे. त्यांचे सादरीकरण या प्रदर्शनात केले आहे.
यावेळी संस्थेच्या विश्वस्त विजयमाला मेस्त्री, प्रेमला भोसले, रघुनाथ जाधव, प्राचार्य सुरेश पोतदार, अमृत पाटील, अजित दरेकर, विजय टिपुगडे उपस्थित होते. प्रा. मनोज दरेकर यांनी प्रास्ताविक केले. अनुराधा क्षीरसागर हिने सूत्रसंचालन केले. निवेदिता काटकर व सोनाली नावडकर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. वैशाली पाटील यांनी आभार मानले.