राज्य बँकेने विकास संस्थांना थेट कर्ज पुरवठा करावा
By admin | Published: January 2, 2017 01:07 AM2017-01-02T01:07:23+5:302017-01-02T01:07:23+5:30
सुभाष देशमुख : राज्य बॅँकेच्या कोल्हापूर शाखेचे उद्घाटन
कोल्हापूर : जिल्हा बँका राजकीय गटा-तटांत अडकल्या असून, विकास संस्थांचे भागभांडवल बँकेकडे घेऊन त्यावर अल्पदराने थेट विकास संस्थांना कर्जपुरवठा करावा, अशी सूचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे केली.
दि महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेच्या कोल्हापूर शाखेचे उद्घाटन मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.
चुकीच्या गोेष्टींमुळे सहकारावरील विश्वास कमी झाला आहे. आगामी काळात हा विश्वास वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगत मंत्री देशमुख पुढे म्हणाले, विकास संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जिल्हा बँका गटा-तटात अडकल्याने विकास संस्थांना पर्यायाने शेतकऱ्यांना राज्य बँक चांगला पर्याय आहे. सहकारात निकोप स्पर्धा झाली पाहिजे. राज्य बँक ग्रामीण भागात येत असल्याने विकास संस्थांना आधार मिळणार आहे.
बाजार समित्या, खरेदी-विक्री संघ, जिल्हा बॅँकेचे राजकारण सांभाळण्यासाठीच विकास संस्था, या उद्देशामुळेच संस्था अडचणीत आल्या. हे बदलायचे आहे, राज्य बँकेने विकास संस्थांना मजबूत करण्याचा आराखडा तयार करण्याची सूचना मंत्री देशमुख यांनी केली.
‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी बँकेचा इतिहास पॉवर पॉर्इंटच्या माध्यमातून सादरीकरण केले. खासदार धनंजय महाडिक, ए. ए. मगदूम, विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक एन. एन. जाधव, एस. बी. शेळके, शाखा व्यवस्थापक प्रमोद कांबळे यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासकीय मंडळाचे सदस्य के. एन. तांबे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
विस्तार करा
पण जपून!
आर्थिक अरिष्टात सापडलेल्या राज्य बॅँकेला बाहेर काढण्याची जबाबदारी दीड वर्षांपूर्वी प्रशासकीय मंडळाकडे दिली. त्यांनी उत्तम काम करत बॅँकेला प्रगतिपथावर आणली. शाखाविस्तार करून व्यवसाय वाढवा, प्रगतीचा आलेख चढता ठेवा, भविष्यात अडचणी आल्या तर हा आलेख स्थिर राहावा पण त्यापेक्षा खाली येऊ नये, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.
शेतीपूरक व्यवसायाला बळ द्या : चंद्रकांतदादा
राज्य बॅँकेने केवळ गृह व वाहन कर्जांत अडकून न पडता शेतीपूरक व्यवसायांना कर्जपुरवठा करून तो बळकट करावा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम होण्यासाठी राज्य बँकेने शेतकरी केंद्रबिंदू मानून वाटचाल करावी, असेही ते म्हणाले.
शेतीवर आधारित साखर उद्योग व ‘गोकुळ’सारख्या प्रक्रिया उद्योगामुळे कोल्हापुरात आर्थिक सुबत्ता आली. शेतकऱ्यांनी ‘पीक पॅटर्न’ बदलणे गरजेचे आहे. कच्चा माल जागेवरच खरेदी होतो, हा विश्वास शेतकऱ्यांच्या मनात निर्माण व्हावा, याकरिता प्रक्रिया उद्योगांच्या उभारणीसाठी राज्य बॅँकेनेच आराखडा तयार करून अल्पदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे, असेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाल
जिल्हा बँकेची शंभर कोटींची ठेव : जिल्हा बँकेने शंभर कोटींच्या ठेवी राज्य बँकेत जमा केल्या. मंत्री चंद्रकांतदादा पाटील व सुभाष देशमुख यांच्या हस्ते बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांना ठेव पावती देण्यात आली. त्याचबरोबर पहिल्या २५ लाखांच्या गृहकर्ज धनादेशाचे वितरणही यावेळी करण्यात आले. े.