राज्य नाट्य स्पर्धेचा पडदा उघडला
By admin | Published: November 8, 2016 01:16 AM2016-11-08T01:16:20+5:302016-11-08T01:27:00+5:30
रसिकांची गर्दी : सुभाष वोरा, शेखर बोडके यांचा विशेष गौरव
कोल्हापूर : हौशी कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ५६ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला रसिकांच्या गर्दीत सोमवारी प्रारंभ झाला. यावेळी ज्येष्ठ नाट्य वितरक सुभाष वोरा आणि केशवराव
भोसले नाट्यगृहाचे व्यवस्थापक शेखर बोडके यांचा विशेष गौरव करण्यात आला.
राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी सव्वा सात बेळगावच्या अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या ‘नेकी’ या नाटकाने झाली. यापूर्वी ज्येष्ठ नाट्य वितरक सुभाष वोरा आणि केशवराव भोसले नाट्यगृहाचे व्यवस्थापक शेखर बोडके यांचा ज्येष्ठ रसिक लक्ष्मण द्रविड यांच्या हस्ते शाल, ग्रंथ भेट देऊन करण्यात आला. नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल वोरा आणि गेल्या वीस वर्षांपासून नाट्य स्पर्धेच्या संयोजनात योगदान देणाऱ्या बोडके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परीक्षक सुरेश बारसे (अमरावती), प्रभाकर दुपारे (नागपूर), सुधाकर गाजरे (नांदेड), स्पर्धेचे समन्वयक मिलिंद अष्टेकर, प्रशांत जोशी, संजय जोग, आदी उपस्थित होते. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. शहराचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहात तीन वर्षांनंतर यंदा वाजलेल्या या तिसऱ्या घंटेला रसिकांनी हाऊसफुल्ल हजेरी लावली. स्पर्धेतील प्रयोगांची वेळ सात ठेवल्याबद्दल अनेक रसिकांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, मध्यपूर्वेकडील इसिसच्या दहशतवादी ठाण्यांवरील मुलींची अवस्था, त्यांच्याबाबतचे भयानक वास्तव मांडणाऱ्या ‘नेकी’ या नाटकाने रसिकांना खिळवून ठेवले. या नाटकाचे लेखन इरफान मुजावर, तर विणा लोकुर यांनी दिग्दर्शन केले. (प्रतिनिधी)
स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
यावर्षीच्या स्पर्धेत २० संघ सहभागी झाले आहेत. त्यातील बहुतांश संघ हे हौशी कलाकारांचे आहेत. स्पर्धेला कलाकारांसह रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे स्पर्धेचे समन्वयक मिलिंद अष्टेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, खास रसिकांच्या मागणीनुसार यंदा स्पर्धेत सादर होणाऱ्या प्रयोगांच्या सादरीकरणाची वेळ सायंकाळी सात केली आहे. त्याबद्दल रसिकांनी विशेषत: ज्येष्ठ रसिकांतून समाधान व्यक्त झाले. स्पर्धेतील शुभारंभाच्या पहिल्या नाटकाला ज्येष्ठ रसिकांची संख्या लक्षणीय होती. आज, मंगळवारपासून स्पर्धा ठीक सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहे. ते लक्षात घेऊन रसिकांनी किमान यावेळेच्या १५-२० मिनिटे आधी नाट्यगृहात स्थानापन्न व्हावे.
पुष्पगुच्छ, भाषणाला फाटा
स्पर्धेच्या उद्घाटनावेळी पुष्पगुच्छ आणि भाषण याला फाटा देण्यात आला. त्याऐवजी उपस्थित रसिकांपैकी एका ज्येष्ठ नाट्यरसिकाच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर पाचच मिनिटांत नाटकाला सुरुवात झाली.