गुरुजींचे देव पाण्यात; टीईटी प्रमाणपत्राची पडताळणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 12:22 PM2022-01-12T12:22:20+5:302022-01-12T12:22:48+5:30
परीक्षा परिषदेच्या या कार्यवाहीमुळे गैरमार्गाचा अवलंब करून पदस्थापना मिळविलेल्या गुरुजींनी देव पाण्यामध्ये ठेवले आहेत.
कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षेमधील (टीईटी) गैरव्यवहार समोर आल्याने दि.१३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांची टीईटी परीक्षेच्या मूळ प्रमाणपत्र तपासणीचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. त्यानुसार टीईटी प्रमाणपत्र संकलित करण्याचे आदेश या परिषदेने जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाला दिले आहेत. या विभागांनी २०९ शिक्षकांची प्रमाणपत्रे परीक्षा परिषदेला सादर केली आहेत.
प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागात ११६, तर माध्यमिक शिक्षण विभागामध्ये ९६ शिक्षक हे दि.१३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झाले आहेत. प्राथमिक शिक्षण विभागातील तीन शिक्षक हे केंद्रीय टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे उर्वरित ११३ आणि माध्यमिक विभागातील शिक्षकांच्या टीईटीची मूळ प्रमाणपत्रे शुक्रवारी सादर केली आहेत. परीक्षा परिषदेच्या या कार्यवाहीमुळे गैरमार्गाचा अवलंब करून पदस्थापना मिळविलेल्या गुरुजींनी देव पाण्यामध्ये ठेवले आहेत.
कशामुळे होतेय पडताळणी
परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी गैरव्यवहार करून गुण वाढविल्याचे प्रकरण अलीकडेच उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर ही पडताळणी केली जात आहे. अशा प्रकारे पात्र ठरवून कोणी शिक्षक नोकरीला लागले का? याचा शोध परीक्षा परिषदेकडून घेतला जात आहे. त्यासाठी आयुक्तांनी कागदपत्रे पडताळणीच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत.
तर, वेतन मिळणार नाही
- परीक्षा परिषदेला परिषदेकडे शिक्षकांनी टीईटीचे मूळ प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठविणे बंधनकारक आहे. जे प्रमाणपत्र पाठविणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
- या प्रमाणपत्रांची बारकाईने पडताळणी करण्यात येणार आहे. यात काही आक्षेपार्ह आढळून आल्यास ती माहिती परीक्षा परिषद शासनाला देईल. त्यानंतर संबंधित शिक्षकांवर कारवाई केली जाईल.
- जे शिक्षक मूळ प्रमाणपत्र सादर करणार नाहीत, त्यांचे गेल्या महिन्याचे वेतन देण्यात येणार नसल्याची माहिती शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिली आहे.
जिल्ह्यातील शिक्षक
पहिली ते पाचवीपर्यंत एकूण शिक्षक : ७९६७
१३ फेब्रुवारीनंतर नियुक्त शिक्षक : ११३
सहावी ते आठवीपर्यंत एकूण शिक्षक : ६८४०
१३ फेब्रुवारीनंतर नियुक्त शिक्षक : ९६
जिल्ह्यातील ९६ माध्यमिक शिक्षकांची टीईटीची मूळ प्रमाणपत्रे पडताळणीसाठी राज्य परीक्षा परिषदेला सादर केली आहेत. पडताळणीची कार्यवाही या परिषदेकडून होईल. -एकनाथ आंबोकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी