प्रदेशनिष्ठ गोवन क्रिकेट फ्राॅगची कोल्हापुरात नोंद, राज्यातील पहिलेच अस्तित्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 11:21 AM2022-01-06T11:21:36+5:302022-01-06T11:23:22+5:30
मिनरव्हारिया गोएमची कुळातील बेडकाची राज्यातील ही पहिलीच नोंद आहे. नव्यानेच आढळलेल्या या दुर्लक्षित प्रदेशनिष्ठ बेडकावर प्राणिशास्त्रज्ञांचे पथक शिवाजी विद्यापीठात अधिक संशोधन करत आहे.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : प्रामुख्याने गोव्यातच दिसणाऱ्या गोवन क्रिकेट फ्रॉग ही बेडकाची उपप्रजात कोल्हापूर जिल्ह्यातील पाटणे (ता. शाहूवाडी) या गावी मिळाली असून, मिनरव्हारिया गोएमची कुळातील बेडकाची राज्यातील ही पहिलीच नोंद आहे. नव्यानेच आढळलेल्या या दुर्लक्षित प्रदेशनिष्ठ बेडकावर प्राणिशास्त्रज्ञांचे पथक शिवाजी विद्यापीठात अधिक संशोधन करत आहे.
गोव्यापासून १५५ किलोमीटर दूर कोल्हापूर जिल्ह्यातील पाटणे (ता. शाहूवाडी) या गावी २०१४मध्ये हा बेडूक या संशोधकांना आढळला. मात्र, याचे मोलेक्युलर डीएनए विश्लेषण लवकर पूर्ण न झाल्याने त्याची आता नोंद झाली. देशात या कुळातील ३७ प्रजाती असून, यापूर्वी २०१७मध्ये त्याची गोव्यात सूरला या गावी नोंद झाली आहे.
मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील डॉ. ओंकार यादव, मूळचे वारणानगरचे डॉ. अमृत भोसले तसेच डॉ. तेजस पाटील या संशोधकांना या प्रदेशनिष्ठ बेडकाचा शोध लावण्याचे श्रेय जाते.
यादव हे सातारा जिल्ह्यातील मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभाग प्रमुख आहेत. त्यांचे सहकारी अमृत भोसले हे कऱ्हाड येथील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये, तर तेजस पाटील हे दहिवडी कॉलेजमध्ये प्राणिशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा हा शोधनिबंध बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाला असून, सरिसृपशास्त्रज्ञ डॉ. वरद गिरी यांनी याची ओळख पटविली आहे. ५.७ सेंटीमीटर आकाराचा हा बेडूक बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस येथे ठेवला होता.
प्रदेशनिष्ठ बेडूक पावसाळ्यात जोडीदाराला बोलावण्यासाठी सतत कीरकीर आवाज काढत असल्यामुळे या बेडकाला क्रिकेट फ्रॉग म्हणून ओळखले जाते. कीड नियंत्रित ठेवतो म्हणून तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्याचे या कुळातील मिनरव्हारिया गोएमची, मिनरव्हारीया निलगिरिका, मिनरव्हारियारुफेसन्स, मिनरव्हारिया सह्याद्रीस, मिनरव्हारिया सह्याद्रेन्सिस या चार प्रकारात वर्गीकरण होते.
गोवा आणि महाराष्ट्रातील पर्यावरणाच्या साधर्म्यामुळे ही प्रजाती उत्तर पश्चिम घाटात सर्वत्र आढळू शकते. पर्यावरणातील बदल, वाढते तापमान, नष्ट होणारा अधिवास यामुळे या उभयचर प्राण्यांना धोका वाढत असून, जगभरातील बेडकांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. या दुर्लक्षित बेडकांच्या प्रजातीवर आणखी अभ्यास होणे गरजेचे आहे. -डॉ. ओंकार यादव, प्राणिशास्त्र विभागप्रमुख, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा (जि. सातारा).