कोल्हापूर विमानतळासाठी २८ कोटींचा निधी मिळणार, मान्यता मिळाली; विस्तारीकरणास चालना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 12:34 PM2024-02-16T12:34:08+5:302024-02-16T12:34:28+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी २८ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने गुरुवारी मान्यता दिली. सामान्य ...
कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळाच्या विकासासाठी २८ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने गुरुवारी मान्यता दिली. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा अध्यादेश काढला.
कोल्हापूर विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचे काम सध्या पूर्ण झाले आहे. मात्र, विस्तारीकरणांतर्गत अनेक कामे सुरू आहेत. धावपट्टी वाढवण्याबरोबरच आणखी काही भूसंपादन करण्यात येणार आहे. यासाठी निधीची कमतरता पडू नये, यासाठी विमानतळाच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस हा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली.
राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी लेखाशीर्ष ३०५३ व ०१६४ खाली निधी उपलब्ध करून देण्यात येतो. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. यापैकी वित्त विभागाने मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून २१० कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित केला आहे.
यातील २६.८२ कोटी कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी दिला. दरम्यान, उर्वरित १५० कोटी रुपयांचा निधी राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी विमानतळ विकास कंपनीला वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. यात कोल्हापूर विमानतळासाठी २८ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. हा निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करावा लागणार आहे.