माणगाव परिषदेच्या शताब्दी महोत्सवाचा खर्च राज्य सरकार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 06:36 PM2020-02-18T18:36:58+5:302020-02-18T18:40:47+5:30
मौजे माणगाव (ता. हातकणंगले) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम दि. २१ आणि २२ मार्चला होणार आहे. त्याचे नियोजन शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) करण्यास समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी मान्यता दिली. कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येणार असल्याचे त्यांनी मंगळवारी मुंबई येथे जाहीर केले.
कोल्हापूर : मौजे माणगाव (ता. हातकणंगले) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम दि. २१ आणि २२ मार्चला होणार आहे. त्याचे नियोजन शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) करण्यास समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी मान्यता दिली. कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येणार असल्याचे त्यांनी मंगळवारी मुंबई येथे जाहीर केले.
माणगाव परिषदेच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन राज्य शासनाच्या बार्टी या संस्थेमार्फत करावे, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी समाजकल्याण मंत्री मुंडे यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार मंत्री मुंडे यांनी मंगळवारी मुंबई येथे मंत्रालयात बैठक घेतली. त्यामध्ये ‘बार्टी’च्या अधिकाऱ्यांना कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात सूचना देऊन लेखी आदेश दिले.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी एक समिती नेमून कार्यक्रमासाठी येणारा संपूर्ण खर्च राज्य सरकारच्यावतीने केला जाईल. त्या खर्चाच्या रकमेची आर्थिक तरतूद येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये केली जाणार असल्याचे मंत्री मुंडे यांनी जाहीर केले.
या बैठकीस ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, समाजकल्याण खात्याचे सचिव, समाजकल्याण आयुक्त, अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या शताब्दी महोत्सव कार्यक्रमासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निमंत्रण दिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, डॉ. आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार, आप्पासाहेब पाटील यांचे कुटुंबीय, महाराष्ट्र राज्यातील विविध खात्यांचे मंत्री, विविध राज्यांतील मंत्री, केंद्रीय मंत्री, आदी या कार्यक्रमास मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समाजकल्याण मंत्री मुंडे आठ ते दहा दिवसांत माणगावला भेट देणार असल्याची माहिती खासदार माने यांनी दिली.