राज्य सरकारकडून पानसरेंच्या हत्येचा तपास दाबण्याचा प्रयत्न, अशोक चव्हाण यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:27 PM2017-12-01T12:27:26+5:302017-12-01T12:45:22+5:30
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला साडेतीन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त शुक्रवारी सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी उमा पानसरे यांची भेट घेतली.
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला साडेतीन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त शुक्रवारी सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी उमा पानसरे यांची भेट घेतली. आजपर्यंत या घटनेच्या तपासामध्ये प्रगती झालेली नाही. ही अतिशय खेदाची बाब आहे. तपास कुठल्या बाजूने आहे, हे देखील स्पष्ट होत नाही. राज्य सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा प्रकारची भावना आमच्यासह लोकांच्या मनात होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला साडेतीन वर्षे पूर्ण झाल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार चव्हाण यांनी पानसरे कुटूंबियांची सागरमाळ येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी उमा पानसरे, मेघा पानसरे यांच्याशी चर्चा करुन तपासासंबधी भावना जाणून घेतल्या.
यावेळी ते म्हणाले, पानसरे हत्येच्या तपासामध्ये अद्यापही प्रगती झालेली नाही. ही अतिशय खेदाची बाब आहे. महाराष्ट्रातील विचारवंताची अशा प्रकारे निघृण हत्या होते. सरकारकडून जी अपेक्षा होती, त्याची आम्ही वाट पाहिली. गेल्या दोन वर्षात काहीतरी निष्पन्न होईल अशी अपेक्षा होती. दूर्देवाने या विषयामध्ये कसलीच प्रगती नाही.
तपास यंत्रणेविषयी लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पानसरे हत्या प्रकरण कुठेतरी निर्णायक स्वरुपाला आले पाहिजे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची शासनाकडून अपेक्षा होती. शासन त्यावर काहीच बोलत नाही. मुख्यमंत्री, मंत्री यांचा या विषयाकडे पाहण्याचा दूष्ठीकोण वेगळाच आहे. त्यांच्याकडून गांर्भीयाने हा विषय घेतला जात नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
तपास यंत्रणेमध्ये वारंवार अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार तपास सुरु असेल तर तपास अधिकारी एकच राहिला पाहिजे. त्यांची बदली होवू नये, चौकशी निर्णायक अवस्थेमध्ये आली पाहिजे. साडेतीन वर्ष झाली, तपास कुठल्या बाजूने आहे हे स्पष्ट होत नाही. राज्य सरकारकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे, अशा प्रकारची भावना होत आहे.
कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर हा विषय विधानसभा व लोकसभेमध्ये विविध मार्गानी उचलून घरुन सरकारला जाब विचारु. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काळीमा फासणारी ही घटना घडली असल्याची खंत चव्हाण यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार सतेज पाटील, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे आदी उपस्थित होते.
वैचारीक सेन्सारशिप लावली आहे काय
राज्यातील सर्व पक्षांमध्ये पानसरे विचारवंताची ही अवस्था होत असेल तर राज्यातील इतरांना बोलण्याची संधी कोणालाच नाही. वैचारीक सेन्सारशिप लावली आहे काय, राज्यात, देशामध्ये असे गंभीर वातावरण अनुभवास मिळत आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कर्तव्याचा भाग समजतो. या दू:खत घटनेमध्ये पानसरे यांच्या कुटूंबियांची भेट घ्यावी, त्यांच्या काय भावना आहेत, त्या समजून घेण्यासाठी मी भेट घेतल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.