Kolhapur: वारणा शिक्षण संकुल आता विद्यापीठ, राज्य सरकारची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 12:21 PM2024-08-26T12:21:00+5:302024-08-26T12:21:25+5:30
वारणानगर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील श्री वारणा विभाग शिक्षण मंडळास ‘वारणा विद्यापीठ म्हणून राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली. मुख्यमंत्री ...
वारणानगर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील श्री वारणा विभाग शिक्षण मंडळास ‘वारणा विद्यापीठ म्हणून राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वारणा विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली आहे. या बातमीचे वृत्त रविवारी सांयकाळी समजताच वारणा परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला.
श्री वारणा सहकारी उद्योग व शिक्षण समूह हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा समूह म्हणून ओळखला जातो. वारणा समूहाचे संस्थापक संस्थापक सहकारमहर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांनी वारणेच्या फोंडया माळावरती साखर कारखान्याबरोबरच शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या सुविधा सुरू करून शिक्षणाचे केंद्र बनवले. वारणा शिक्षण मंडळात केजीपासून प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च शिक्षणांपर्यंतच्या सर्व शैक्षणिक सुविधा सुरू केल्या आहेत. आज हे संकुल शिक्षण क्षेत्रातील अव्वल दर्जाचे ओळखले जाते. वारणा संकुल वारणा विद्यापीठ व्हावे यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. उच्च व तंत्रशिक्षण खात्याच्या आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले.
वारणा पंचक्रोशीतील सर्वसामान्य व छोट्या घटकांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वारणा शिक्षण समूहाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. आता वारणा विद्यापीठास मान्यता मिळाली असल्याने शिक्षण क्षेत्रात नवी सुरुवात झाली. या विद्यापीठाच्या माध्यमातून सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांना अपेक्षित नवा माणूस घडवण्याचा मूळ विचार विद्यापीठाच्या केंद्रस्थानी ठेवला आहे असल्याचे वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी यांनी सांगितले.
वारणा विद्यापीठास मंजुरी मिळाल्याचे समजताच वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे, वारणा शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही.व्ही. कार्जीनी यांच्यासह वारणा शिक्षण संकुल आणि वारणा परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. परिसरात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा झाला.