सेवा रुग्णालयास राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार, रुग्णालय राज्यात दुसरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 06:48 PM2020-10-21T18:48:46+5:302020-10-21T18:51:20+5:30
hospital, kolhapurnews, doctors, नॅशनल हेल्थ मिशनतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय कायाकल्प द्वितीय पुरस्कार सेवा रुग्णालयाला मिळाला असून ते जिल्ह्यातील पहिले रुग्णालय ठरले आहे. राज्य समितीने जानेवारीत मूल्यमापन केले होते. या रुग्णालयास पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.
कोल्हापूर : नॅशनल हेल्थ मिशनतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय कायाकल्प द्वितीय पुरस्कार सेवा रुग्णालयाला मिळाला असून ते जिल्ह्यातील पहिले रुग्णालय ठरले आहे. राज्य समितीने जानेवारीत मूल्यमापन केले होते. या रुग्णालयास पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.
गेल्या चार वर्षांपासून स्वच्छ भारत अभियान धर्तीवर केंद्र शासनाने शासकीय रुग्णालयांसाठी ह्यकायाकल्प योजनाह्ण जाहीर केली असून, या योजनेत रुग्णालयाची अंतर्गत व बाह्य स्वच्छता, जैववैद्यकीय व घनकचरा व्यवस्थापन, रुग्णांची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, आदी गोष्टींचे मूल्यांकन यांचे तीन टप्प्यांत गुणांकन होऊन प्रथम व द्वितीय क्रमांक काढले जातात.
जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, ग्रामीण रुग्णालय कागल, वसाहत रुग्णालय गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय हातकणंगले व ग्रामीण रुग्णालय खुपिरे यांना उत्तेजनार्थ एक लाखाचे बक्षीस जाहीर झाले आहे.
पुरस्कारप्राप्त अन्य रुग्णालये
कम्युनिटी आरोग्य केंद्र- कागल, गडहिंग्लज, गांधीनगर, खुबीने व हातकणंगले (प्रत्येकी एक लाख)
प्राथमिक आरोग्य केंद्र- बोरपाडळे, सरवडे, आळते, अब्दुललाट, इस्पुर्ली, मलिग्रे, शिरोली दुमाला, वाटंगी, उत्तूर व कणेरी (प्रत्येकी ५० हजार)
कोरोनाकाळात जिल्ह्याचा आधारवड
जिल्ह्यातील थोरला दवाखाना हा कोरोनाकाळात कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवल्याने जिल्ह्याचा आरोग्य सेवेचा भार सेवा रुग्णालयावर आला. या काळात सेवा रुग्णालयात ४० बेडची व्यवस्था असतानाही येथे ७० बेडची व्यवस्था करून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
रुग्णालयाला मिळालेल्या यशात येथे सेवा बजावणाऱ्या सर्व कर्मचारी वर्गाचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांमुळे हे शक्य झाले. रुग्णसेवेला प्राधान्य देऊन करीत असलेल्या कामाची सरकारनेही दखल घेतली.
- डॉ. उमेश कदम
वैद्यकीय अधीक्षक, सेवा रुग्णालय.
आजपर्यंत मिळालेले पुरस्कार.
- लक्ष पुरस्कार(राष्ट्रीय स्तर)
- राष्ट्रीय गुणवत्ता अभिवचन (दोन वेळा)
- डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार प्रथम (दोन वेळा)
- कायाकल्प उत्तेजनार्थ (तीन वेळा)