राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा : कोल्हापूरसह नागपूर, औरंगाबाद, आदींची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:24 PM2018-11-02T12:24:33+5:302018-11-02T12:29:30+5:30

कोल्हापुरातील शाहू स्टेडियम व शिवाजी स्टेडियम येथे सुरू असलेल्या १७ वर्षांखालील मुली व १९ वर्षांखालील मुले राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरच्या दोन्ही संघांसह नागपूर, औरंगाबाद, क्रीडा प्रबोधिनी, मुंबई, पुणे या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत आगेकूच केली. 

State-level school football tournament: Nagpur, Aurangabad, Kolhapur, etc. | राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा : कोल्हापूरसह नागपूर, औरंगाबाद, आदींची बाजी

 कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर विभाग व अमरावती विभाग यांच्यात झालेल्या सामन्यांतील एक क्षण. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देराज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा : कोल्हापूरसह नागपूर, औरंगाबाद, आदींची बाजी१७ वर्षांखालील मुली, १९ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत अटीतटीची लढत

कोल्हापूर : कोल्हापुरातील शाहू स्टेडियम व शिवाजी स्टेडियम येथे सुरू असलेल्या १७ वर्षांखालील मुली व १९ वर्षांखालील मुले राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरच्या दोन्ही संघांसह नागपूर, औरंगाबाद, क्रीडा प्रबोधिनी, मुंबई, पुणे या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत आगेकूच केली. 

उद्घाटनाच्या १७ वर्षांखालील मुलींच्या पहिल्या सामन्यात कोल्हापूर विभाग (छत्रपती शाहू विद्यालय)ने मुंबई विभाग (बॉम्बे स्कॉटिश, माहीम) चा ४-१ असा पराभव केला. कोल्हापूरकडून निहारिक पाटील हिने तीन गोल करीत स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक केली; तर तिला सनातुबी हिने एक गोल करीत मोलाची साथ दिली. मुंबईकडून प्रणिता निमकर हिने एकमेव गोल केला.

दुसऱ्या सामन्यात नागपूर विभाग (प्रागतिक माध्यमिक व उच्च माध्यमिक, कोराडी, ता. कामठी) संघाने लातूर विभाग (बंकटलाल लाहोटी इंग्लिश मीडियम स्कूलचा ७-० असा एकतर्फी पराभव केला. नागपूरकडून इशा सिलारे हिने ३, आयुषी सूर्यवंशी हिने दोन, तर सेजल सोनारे व रक्षदा सोनेकर हिने प्रत्येकी एक गोल केला.

तिसऱ्या सामन्यात औरंगाबाद विभाग (पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, आष्टा) या संघाने नाशिक विभाग (सेंट झेव्हिअर्स स्कूल, नाशिक)चा टायब्रकेरवर ४-२ असा पराभव केला. चौथ्या सामन्यात पुणे विभाग (प्रवरा कन्या विद्यामंदिर, लोणी) संघाने क्रीडा प्रबोधिनी संघाचा १-० असा निसटता पराभव केला. ‘पुणे’कडून विजयी गोल स्नेहल कळमळकर हिने नोंदविला.

कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे राज्यस्तरीय १७ व १९ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापौर शोभा बोंद्रे, मधुरिमाराजे यांच्या उपस्थित झाले. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे, माणिक मंडलिक उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

१९ वर्षांखालील मुलांमध्ये कोल्हापूर विभाग (महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर ) संघाने औरंगाबाद विभाग (मौलाना आझाद विद्यालय) संघाचा ४-० असा एकतर्फी पराभव केला. कोल्हापूरकडून दिग्विजय आसनेकरने दोन, तर प्रणव कणसे व ओंकार बेळगूडकर यांनी प्रत्येकी एका गोलची नोंद केली.

दुसऱ्या सामन्यात नागपूर विभाग (हिस्लोप कॉलेज)ने नाशिक विभाग (भोसला मिलिटरी कॉलेज) संघाचा टायब्रेकरवर ५-४ असा निसटता पराभव केला. या सामन्यांत एकूण वेळेत २-२ अशी अटीतटीची लढत झाली. नागपूर संघाकडून बादल सोरेनने, तर नाशिककडून रुतीज अहिरराव यांनी प्रत्येकी दोन गोल केले.

क्रीडापीठ अर्थात क्रीडा प्रबोधिनी (पुणे)ने लातूर विभाग (फैजल उलूम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज)चा ६-० असा एकतर्फी पराभव केला. क्रीडा प्रबोधिनीतर्फे विश्वनाथ शेळके, सतीश हवालदार यांनी प्रत्येकी दोन, तर निहाल डबाले, शिवराज पाटील यांनी प्रत्येकी एका गोलची नोंद केली. दुपारच्या सत्रात कोल्हापूरच्या संघाने अमरावती संघावर २-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, अंधुक प्रकाशामुळे हा सामना थांबविण्यात आला.

स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापौर शोभा बोंद्रे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सदस्या मधुरिमाराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी उद्योजक चंद्रकांत जाधव, जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे, उदय पाटील, उदय आतकिरे, एस. एस. मोरे, राजेंद्र दळवी, सुधाकर जमादार, क्रीडाधिकारी बालाजी बरबंडे, विकास माने, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, प्रदीप साळोखे, आदी उपस्थित होते.
 

Web Title: State-level school football tournament: Nagpur, Aurangabad, Kolhapur, etc.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.