राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धा : कोल्हापूर, पुणे विभागाची संघाची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:52 AM2019-10-15T11:52:58+5:302019-10-15T11:54:58+5:30
कोल्हापूर येथील जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा हॉकी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय १४ वर्षांखालील मुलांत पुणे विभाग (गौतम पब्लिक स्कूल) तर मुलींत कोल्हापूर विभाग (न्यू इंग्लिश स्कूल, नूल) तर १७ वर्षांखालील मुलांत कोल्हापूर विभाग (डी. सी. नरके विद्यानिकेतन, कुडित्रे) मुलींत श्री शिवछत्रपती क्रीडापीठ (पुणे) संघांनी बाजी मारली.
कोल्हापूर : येथील जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा हॉकी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय १४ वर्षांखालील मुलांत पुणे विभाग (गौतम पब्लिक स्कूल) तर मुलींत कोल्हापूर विभाग (न्यू इंग्लिश स्कूल, नूल) तर १७ वर्षांखालील मुलांत कोल्हापूर विभाग (डी. सी. नरके विद्यानिकेतन, कुडित्रे) मुलींत श्री शिवछत्रपती क्रीडापीठ (पुणे) संघांनी बाजी मारली.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात शालेय १४ वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम सामना पुणे विभाग (गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर) संघाने कोल्हापूर विभाग (विद्यामंदिर इस्लामपूर) संघावर ३-२ अशा गोलफरकाने मात केली. यामध्ये कार्तिक पठारेने दोन, पार्थ देशमुखने एक गोल केला. कोल्हापूर संघाकडून साईराज खांबरे, राहुल मालगोंडा यांनी प्रत्येकी एक गोल केला.
मुलीच्या अंतिम सामन्यात कोल्हापूर विभाग (न्यू इंग्लिश स्कूल, नूल) संघाने पुणे विभाग, सहस्त्रार्जुन प्रशाला, सोलापूर) संघावर ४-० अशा गोलफरकाने मात केली. कोल्हापूर संघाकडून सानिका माने, सौम्या कडलगे, श्रेया कराडे व सारिका आरबोडे यांनी प्रत्येकी एक गोल केला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटातील कोल्हापूर विभाग (डी. सी. नरके विद्यानिकेतन, कुडित्रे) संघाने श्री शिवछत्रपती क्रीडापीठ (पुणे) संघावर पेनल्टी स्ट्रोकवर ३-२ अशा गोलफरकाने मात केली.
कोल्हापूर संघाकडून विनायक हांडे, शुभम मोळे, गुरूनाथ कारंडे यांनी तर पुणे क्रीडापीठ संघाकडून यश उरूणकर व सागर शिंगाडे यांनी प्रत्येकी एक गोल केला. शालेय १७ वर्षांखालील मुलींच्या संघात श्री शिवछत्रपती क्रीडापीठ संघाने कोल्हापूर विभाग न्यू इंग्लिश स्कूल नूल संघावर १-० अशा गोलफरकाने विजय मिळविला. विजयी संघाकडून अश्विनी कोळेकर हिने गोल केला.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा हॉकी संघटना, महाराष्ट्र क्रीडा मंडळ स्पर्धा प्रमुख उदय पवार, सागर जाधव, विजय सरदार, नजीर मुल्ला, योगेश देशपांडे, संतोष चौगुले, योगेश माने, प्रदीप पवार, शिवाजी डुबल, रणजित इंगवले, क्रीडाशिक्षक महेश सूर्यवंशी, हॉकी प्रशिक्षक मोहन भांडवले यांनी विशेष परिश्रम घेतले.
तिसरा क्रमांकासाठी....
तिसरा क्रमांकासाठी झालेल्या लढतीमध्ये शालेय १४ वर्षांखालील मुलींच्या वयोगटांत नागपूर विभाग (ईरा इंटरनॅशनल स्कूल, नागपूर) संघ तर मुलांत मुंबई विभाग (डॉन बास्को हायस्कूल, माटुंगा)या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. शालेय १७ वर्षांखालील मुलीत नागपूर विभाग (ईरा इंटरनॅशनल स्कूल), मुलांत पुणे विभाग (यश अॅकॅडमी, सोनाई) या दोन्ही संघांनी तिसरा क्रमांक पटकाविला.