प्रदेशाध्यक्षांनी आटोपली पाचच मिनिटांत भेट

By admin | Published: December 1, 2015 12:53 AM2015-12-01T00:53:00+5:302015-12-01T00:53:11+5:30

विधानपरिषदेचे राजकारण : पी. एन., आवाडे, महाडिक यांनी दिले उभ्या-उभ्याच निवेदन; तिकिटासाठी शर्थीचे प्रयत्न

The State President met in five minutes | प्रदेशाध्यक्षांनी आटोपली पाचच मिनिटांत भेट

प्रदेशाध्यक्षांनी आटोपली पाचच मिनिटांत भेट

Next

कोल्हापूर : विधानपरिषदेची उमेदवारी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना सोडून आमच्यापैकी कुणालाही द्या, असे सांगायला गेलेल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे निवेदन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टिळक भवनच्या दारातच उभ्या-उभ्या स्वीकारले. अवघी पाचच मिनिटे त्यांची भेट झाली. त्यामुळे या भेटीतून त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. ‘ठीक आहे, बघतो..’ एवढेच दोन शब्दांचे आश्वासन चव्हाण यांनी या नेत्यांना दिले.
विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसच्या मुलाखती यापूर्वीच झाल्या आहेत. त्यावेळीही हे तिघे नेते स्वतंत्रपणे प्रदेशाध्यक्षांना भेटले होते; परंतु ही उमेदवारी सतेज पाटील यांना मिळणार असे वातावरण तयार झाले आहे. त्यांचा उमेदवारीचा दावा प्रबळ आहे. त्यामुळे स्पर्धेतल्या या अन्य तिघांनी रविवारी कोल्हापुरात बैठक घेऊन आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या; परंतु ती सतेज पाटील यांना देऊ नका, असा पवित्रा घेतला व तसे सांगण्यासाठी आज, सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते प्रदेशाध्यक्षांना भेटले. काँग्रेसच्या संसदीय मंडळाची मुंबईतील टिळक भवनात बैठक होणार होती. त्याच्या अगोदर तिथे गेलेल्या या तिघांना चव्हाण प्रदेश मुख्यालयाच्या दारातच भेटले. त्यांची यासंदर्भात स्वतंत्र चर्चा झाली नाही. अगदी दोन मिनिटांत जसे विमानतळावर मंत्री निवेदन स्वीकारतात अशा घाई-गडबडीत त्यांनी हे निवेदन स्वीकारले. त्यानंतर थोडावेळ थांबून पी. एन. पाटील व आवाडे हे एकाच गाडीतून निघून गेले; परंतु आमदार महाडिक मात्र चव्हाण यांना भेटण्यासाठी सुमारे दोन तास प्रतीक्षा करीत बसले होते. त्यांच्यासोबत बॉबी भोसले होते. ते कुणाला तरी मोबाईल लावून देत होते. त्याचदरम्यान तिथे नारायण राणे, पतंगराव कदम आणि राधाकृष्ण विखे-पाटील आले. त्यांनाही भेटण्याचा महाडिक यांनी प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश आले नाही. हे नेते संसदीय मंडळाच्या बैठकीसाठी गडबडीत निघाले असल्याने ही भेट होऊ शकली नाही. (प्रतिनिधी)


उमेदवारीची घोषणा रविवारी शक्य
काँग्रेसच्या उमेदवारीची घोषणा होण्यास आणखी तीन-चार दिवस लागतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पी. एन. पाटील, महाडिक व आवाडे हे निवेदन देऊन गेले. विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू होते; परंतु त्यादिवशी उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता नाही. मी उद्या, बुधवारी दिल्लीस जाणार आहे. त्यानंतर दोन-तीन दिवसांत ही घोषणा होईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बहुधा ही घोषणा रविवारी (दि. ६) होण्याची शक्यता आहे. बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत चालू ठेवण्याची काँग्रेसमध्ये प्रथाच आहे.


कोल्हापूर विधानपरिषदेची उमेदवारी सतेज पाटील यांना सोडून आमच्यापैकी कुणालाही द्या, अशी मागणी करणारे निवेदन सोमवारी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील व प्रकाश आवाडे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मुंबईतील टिळक भवनाच्या दारात दिले.


महाडिक-आवाडे दिल्लीस रवाना
कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकीतील काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी आमदार महादेवराव महाडिक व माजी मंत्री प्रकाश आवाडे हे सोमवारी सायंकाळी दिल्लीस रवाना झाल्याचे समजते. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील हे मात्र मुंबईतच तळ ठोकून आहेत.
या तिन्ही नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेऊन आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर महाडिक बराच वेळ प्रदेश काँग्रेस कार्यालयात थांबून होते. सायंकाळी ते व आवाडे हे दिल्लीस रवाना झाल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष चव्हाण हे देखील आज, मंगळवारी सायंकाळी दिल्लीस जाणार आहेत. येत्या तीन-चार दिवसांत दिल्ली हाच केंद्रबिंदू राहणार आहे. त्यामुळे तिथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून लॉबिंग करण्यासाठी हे दोघे दिल्लीस गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या तिघांनी प्रदेशाध्यक्षांना सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘आम्ही तिघेही काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहोत. आम्ही तिघेही गेली २५ वर्षे काँग्रेसची ध्येय-धोरणे मान्य करून पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्नशील आहोत. भविष्यातही पक्षाच्या विकासाच्या दृष्टीने आमच्या अनुभवाचा लाभ पक्षाला व्हावा हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे म्हणून आम्ही तिघेही आपणांस विनंती करतो की, आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्यावी. या उमेदवारीने काँग्रेस सर्व नेते व कार्यकर्ते समाधानी होतील व काँग्रेसच्याच उमेदवाराचा विजय होईल याची ग्वाही देतो.’ विधान परिषदेचे तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The State President met in five minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.