राजेश लाटकर यांना ‘राष्टवादी’ची नोटीस कारवाई करण्याचा प्रदेशाध्यक्षांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 10:44 AM2019-04-04T10:44:29+5:302019-04-04T10:49:06+5:30
राष्टवादी कॉँग्रेसचे अधिकृत उमेदवार धनंजय महाडिक यांचा प्रचार न करता विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करीत असल्याबद्दल राष्टवादी कॉँग्रेसचे प्रदेश संघटक-सचिव राजेश लाटकर यांना नोटीस बजावून
कोल्हापूर : राष्टवादी कॉँग्रेसचे अधिकृत उमेदवार धनंजय महाडिक यांचा प्रचार न करता विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करीत असल्याबद्दल राष्टवादी कॉँग्रेसचे प्रदेश संघटक-सचिव राजेश लाटकर यांना नोटीस बजावून कारवाई करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे. ही नोटीस बुधवारी सकाळी लाटकर यांना बजावण्यात आली.
लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातून राष्टÑवादी कॉँग्रेसचे अधिकृत उमेदवार धनंजय महाडिक असून, त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून विरोधी पक्षाच्या उमेदवाराशी संगनमत करून त्यांच्या बाजूने प्रचार सुरू केला आहे. विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन प्रचार केल्याच्या तक्रारी पक्ष कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या आहेत. ही बाब पक्षशिस्तीला धरून नाही. तेव्हा याबाबतचा खुलासा तत्काळ करावा. खुलासा न आल्यास आपल्यावर कारवाई करण्यात येईल, असे नोटिसीमध्ये म्हटले आहे. राष्टÑवादीचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार यांनी लाटकर यांच्या घरी जाऊन ही नोटीस दिली.
राष्टवादीचे माजी शहराध्यक्ष असलेले लाटकर सध्या प्रदेश संघटक-सचिव असून ते या निवडणुकीत प्रथमपासून शिवसेना उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारात भाग घेत आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी जाऊन त्यांनी प्रचारदेखील सुरू केला आहे. राष्टवादी पक्षाच्या कोणत्याही बैठकीला ते व त्यांच्या पत्नी नगरसेविका सूरमंजिरी लाटकर उपस्थित राहिलेल्या नाहीत. महाडिक आणि लाटकर यांच्यातील मागील निवडणुकीपासून सुरू असलेला वाद पाहता, ते परत राष्टवादीचा प्रचार करण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे लाटकर यांना पक्षातून निलंबित केले जाऊ शकते.