राज्य लोकसेवेचा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर, मुलाखत घेतली पण यादीत नावच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 02:55 PM2020-12-11T14:55:35+5:302020-12-11T14:58:53+5:30
mpsc, kolhapur, result महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या सरळसेवा भरती प्रक्रियेत गोंधळ असल्याचे पुन्हा एकवेळ निदर्शनास आले. सहाय्यक संचालक (माहिती) या पदासाठी १४ सप्टेंबर २०२० ला झालेल्या थेट मुलाखतीचा निकाल जाहीर झाला. मुलाखत दिलेले दहा उमेदवारांपैकी एका उमेदवाराचे नाव वगळून निकाल जाहीर केला आहे.
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या सरळसेवा भरती प्रक्रियेत गोंधळ असल्याचे पुन्हा एकवेळ निदर्शनास आले. सहाय्यक संचालक (माहिती) या पदासाठी १४ सप्टेंबर २०२० ला झालेल्या थेट मुलाखतीचा निकाल जाहीर झाला. मुलाखत दिलेले दहा उमेदवारांपैकी एका उमेदवाराचे नाव वगळून निकाल जाहीर केला आहे.
आयोगाने १ आँगस्ट २०१७ ला सहाय्यक संचालक (माहिती) गट ब या पदाच्या ५ जागांसाठी सरळसेवेतून अर्ज मागविले होते. या पदासाठी एकूण १६५ उमेदवरांनी अर्ज केले. कोल्हापूरच्या चंद्रकांत कबाडे या उमेदवाराने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालय (मँट) मधून अपात्र यादीवर आक्षेप नोंदविला होता. त्यावर मँटने कबाडे यांच्या बाजूने निकाल दिला.कबाडे यांना मुलाखतीसाठी १४ सप्टेंबर २०२० ला आयोगाने मुलाखत पत्र देऊन रितसर बोलविले.
आयोगाने कबाडे यांच्यासह १० उमेदवारांच्या मुलाखती मुबंईत घेतल्या. गुरुवारी या मुलाखतीचा निकाल जाहीर केला. या निकालात आयोगाने गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये दहापैकी ९ लोकांचीच नावांची जाहीर केली,परंतु या यादीत आयोगाने कबाडे यांचे नाव पात्र अथवा अपात्र या दोन्ही पैकी कोठेही नमुद न करता यादी प्रसिद्ध केली.
यातून आयोगाचा भोंगळ कारभार स्पष्ट झाला आहे.विशेष म्हणजे कबाडे यांची मुलाखत राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष गवई यांच्या पँनेलने त्यांच्या दालनात घेतली होती. तरीही नाव वगळून यादी प्रसिद्ध केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे..