राज्यात मटक्यातील २५० कोटींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:25 AM2019-10-07T00:25:21+5:302019-10-07T00:25:26+5:30
एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि गुजरात या राज्यांतील मटका-जुगाराचे कनेक्शन चालविणाऱ्या प्रमुख ...
एकनाथ पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि गुजरात या राज्यांतील मटका-जुगाराचे कनेक्शन चालविणाऱ्या प्रमुख दहा बुकीचालकांच्या मुसक्या कोल्हापूर पोलिसांनी आवळल्याने महाराष्ट्रातील ‘मुंबई मटका’ ठप्प होऊन सुमारे २५० कोटींच्या उलाढालीला ब्रेक लागला आहे. गेले सात महिने मुंबई मटका पूर्णत: बंद आहे.
मटका-जुगार बंद करणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. या गुन्ह्यात जामीन असल्याने डझनभर कारवाया झाल्या तरी बुकीचालक पुन्हा मटका सुरू करीत होते. बोरिवली, मुंबई येथून प्रकाश ऊर्फ पप्पू हिरजी सावला हा आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि गुजरात या राज्यांतील मुंबई मटक्याचे कनेक्शन हाताळत होता. या चारही राज्यांत बुकीचालक नेमून हजारो एजंटांचे जाळे विखुरले होते.
कोल्हापुरातील यादवनगर-पांजरपोळ येथे ८ एप्रिल २०१९ च्या रात्री मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह त्यांच्या पथकावर सलीम मुल्ला याच्यासह ४०० जणांच्या जमावाने हल्ला करीत बेदम मारहाण केली. अवैध व्यावसायिकांकडून पोलिसांवर हात उगारला गेल्याने राज्यभर खाकी वर्दीची नाचक्की झाली. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेत मुल्ला गँगवर कठोर कारवाईचा पवित्रा घेऊन ‘मोक्का’ कारवाई केली. सलीमच्या संपर्कात असणाºया मटका-जुगाराचे मुंबईतील म्होरके प्रकाश सावला, जयेश शहा, वीरज सावला, जितेंद्र गोसालिया, राजेंद्र टोपी यांच्यासह स्थानिक सम्राट कोराणे, मनीष अग्रवाल यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली. कोल्हापूरपासून मुंबई, गोवा, कर्नाटक आणि गुजरात येथील रॅकेटचे म्होरके अटक झाल्याने मुंबई मटका दीर्घकाळ बंद राहिला. गेले सात महिने तो बंद राहिल्याने सुमारे २५० कोटींच्या उलाढालीला ब्रेक लागला आहे.
कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, पुणे ग्रामीण, बेळगाव या सहा जिल्ह्यांतील मटका-जुगाराचे म्होरके अग्रवाल, कोराणे आहेत. त्यांचे नेटवर्क सांभाळण्यासाठी सलीम मुल्लासह एक हजारच्या आसपास एजंटांचे जाळे विखुरलेले होते. ओसवालचे थेट मुंबईतून मटक्याचे कनेक्शन होते. त्याची एकट्याची दिवसाची उलाढाल १० कोटी असल्याचे पोलीस सांगत आहेत.
राज्यातील मटक्यातील दहा म्होरके
सलीम यासीन मुल्ला (रा. यादवनगर, कोल्हापूर), मनीष किशोर अग्रवाल (इचलकरंजी), सम्राट बबन कोराणे (शिवाजी पेठ, कोल्हापूर), प्रकाश ऊर्फ पप्पू हिरजी सावला, जयेश सेवांतीलाल शहा, विरज प्रकाश सावला, शैलेश गुणवंतराव मणियार, जितेंद्र ऊर्फ जितू कांतीलाल गोसालिया, राजेंद्र ऊर्फ राजू धरमसी दवे ऊर्फ टोपी, जयेश हिरजी सावला (सर्व रा. बोरिवली पश्चिम, मुंबई).