राज्याला अवकाळी पावसाने झोडपले, काढणीच्या पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 06:10 AM2021-11-18T06:10:49+5:302021-11-18T06:11:11+5:30

काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान, वातावरणात गारवा

The state was hit by unseasonal rains, damage to harvested crops | राज्याला अवकाळी पावसाने झोडपले, काढणीच्या पिकांचे नुकसान

राज्याला अवकाळी पावसाने झोडपले, काढणीच्या पिकांचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देबीडमध्येही ठिकठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे  शिवारात पाणी तुंबल्याने ऊसतोडणीही  थांबवावी लागली. 

कोल्हापूर : बंगालच्या उपसागरात कमीदाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात मंगळवारी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूरसह, सातारा, सांगली, बीड जिल्ह्याला रात्रभर पावसाने झोडपून काढले. मुंबई, हिंगोली, विदर्भात पावसाने काहीसा शिडकावा केला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी काढणीला आलेल्या पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांपुढे पुन्हा नवे संकट निर्माण झाले आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी सुरू झालेला पाऊस मध्यरात्रीपर्यंत कोसळतच होता. पावसाने महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान झाले. सिंधुदुर्गमध्ये अवकाळीच्या हजेरीमुळे झाडे, विजेचे खांब रस्त्यावर पडले तर काही घरांची कौले उडून गेल्याने संसार उघड्यावर आले. लातूर, उस्मानाबाद, बीडमध्येही ठिकठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे  शिवारात पाणी तुंबल्याने ऊसतोडणीही  थांबवावी लागली. 

थंडी गायब, तापमानात वाढ
पावसाचे ढग राज्यावर सातत्याने दाखल होत असून, हवामान ढगाळ आहे. त्यामुळे थंडी पुन्हा एकदा गायब झाली आहे. हवामान बदलांमुळे किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. राज्यावर आलेले आभाळ नाहीसे झाल्यानंतर पुन्हा थंडीला सुरुवात होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आणखी दोन दिवस पावसाचा इशारा
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तमिळनाडूजवळ सरकत आहे. तर अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकत आहे. यामुळे हवामान खात्याने राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे.
 

Web Title: The state was hit by unseasonal rains, damage to harvested crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.