चुकांचे चटके ‘दोघांना’ही प्रकाश आवाडे : ‘महाडिक-पाटील’ वादावर वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:53 AM2019-03-23T00:53:28+5:302019-03-23T00:54:04+5:30
गेल्या पाच वर्षांत सतेज पाटील व धनंजय महाडिक हे एकमेकांशी कसे वागले, हे जिल्ह्याने पाहिले आहे.
कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांत सतेज पाटील व धनंजय महाडिक हे एकमेकांशी कसे वागले, हे जिल्ह्याने पाहिले आहे. एकाच बाजूने असे घडत नाही. त्या चुकांचे चटके दोघांनाही बसत आहेत; पण ‘डॅमेज कंट्रोल’ निश्चित होईल, असा विश्वास कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला. कोल्हापुरातील आघाडीच्या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी दुखावलेली मने सांधावीच लागतील, असेही त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे सचिव बाजीराव खाडे यांनी शुक्रवारी कॉँग्रेस कमिटीत भेट दिली. यावेळी आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. प्रकाश आवाडे म्हणाले, जिल्ह्यात कॉँग्रेसच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे; तरीही कार्यकर्ते एकदिलाने काम करतील. लोकसभेच्या प्रचारात कॉँग्रेसचे कार्यकर्ते राष्टÑवादीच्या पुढे एक पाऊल राहतील.
बाजीराव खाडे म्हणाले, कॉँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशात चांगला प्रतिसाद मिळत असून, कॉँग्रेस कार्यकर्त्यांत चैतन्य आले आहे. कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या महाराष्टÑात गेल्या वेळेला केवळ दोन खासदार निवडून आले, ही नामुष्की असून चुका दुरुस्त करीत पुन्हा महाराष्टÑ कॉँग्रेसमय करायचा आहे. महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्यानंतर राजकारणातून संन्यास घेतला, त्यावेळी अजून संविधान तयार व्हायचे असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना भेटून नाराजी व्यक्त केली होती. यावर सामान्य व कमजोर माणूस केंद्रबिंदू मानून निर्णय घेण्याचा सल्ला त्यावेळी दिला होता. त्याप्रमाणे सध्याची परिस्थिती असून, जिल्ह्यातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या सल्ल्यानुसारच पुढे गेले पाहिजे.
कॉँग्रेस सोशल मीडिया सेलच्या पश्चिम महाराष्टÑ प्रमुखाची निवड झाल्याबद्दल आवाडे यांच्या हस्ते चंदा बेलेकर यांचा सत्कार झाला. यावेळी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महिला अध्यक्ष संध्या घोटणे, किरण मेथे, सरलाताई पाटील, आदी उपस्थित होते. प्रदेश सरचिटणीस तौफिक मुल्लाणी यांनी आभार मानले.
सातारा, सांगलीचे सतेज पाटील ‘समन्वयक’
सांगली व सातारा लोकसभा मतदारसंघांचे काँग्रेस पक्षाचे समन्वयक म्हणून आमदार सतेज पाटील यांची नियुक्ती केली. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी ही नियुक्ती केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आघाडीमध्ये समन्वय राहावा, यासाठी कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसचा प्रयत्न आहे. दोन्ही पक्षांकडून समन्वयकांच्या नेमणुका केल्या असून, आघाडीमधील अडचणी व एकूणच प्रचाराच्या यंत्रणेत समन्वयकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आमदार सतेज पाटील यांची सांगली व सातारा लोकसभा मतदारसंघांसाठी नियुक्ती केली आहे. आपण व राष्टÑवादीच्या समन्वयकांनी एकत्रित आघाडीच्या उमेदवारांशी संपर्क साधावा व दोन्ही पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांचा प्रचारात आवश्यक तो समन्वय राहील, या दृष्टीने प्रयत्न करावेत, असेही प्रदेश कॉँग्रेसने पत्रात म्हटले आहे.
विधानसभेची तयारी!
दोन्ही मतदारसंघांत कॉँग्रेसचे उमेदवार नसले तरी आघाडी धर्म म्हणून कॉँग्रेस कार्यकर्ते ताकदीने काम करतील. लोकसभा निवडणुकीतून आम्ही विधानसभेची तयारी करीत असून, जिल्ह्यात सर्वाधिक आमदार कॉँग्रेसचेच असतील, असे आवाडे यांनी सांगितले.
‘सांगली’साठी
‘प्रदेश’कडे आग्रह
आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा कॉँग्रेसच्या हातून सुटण्याची भीती तेथील कार्यकर्त्यांना आहे. एका शिष्टमंडळाने आपली भेट घेतली. वसंतदादांच्या जिल्ह्यातच कॉँग्रेसच्या अवस्थेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांच्या भावना ‘प्रदेश’कडे पोहोचविल्याचे आवाडे यांनी सांगितले.