राज्यातील दुष्काळजन्य स्थिती ३१ आॅक्टोबरपर्यंत जाहीर : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 07:11 PM2018-10-06T19:11:54+5:302018-10-06T19:17:30+5:30
महाराष्टतील दुष्काळसदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारने ‘अॅप’ची निर्मिती केली असून, त्याद्वारे केंद्राने ठरवून दिलेल्या तीन टप्प्यातील निकषांची पाहणी करण्यात येत आहे.
कोल्हापूर : महाराष्टतील दुष्काळसदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारने ‘अॅप’ची निर्मिती केली असून, त्याद्वारे केंद्राने ठरवून दिलेल्या तीन टप्प्यातील निकषांची पाहणी करण्यात येत आहे. त्यानुसार सलग २१ दिवस पाऊस न पडलेल्या २०० तालुक्यांचे सर्वेक्षण सुरू आहे, हे तिन्ही टप्प्यांतील सर्वेक्षण २५ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण होऊन ३१ आॅक्टोबर रोजी राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती जाहीर केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात एका कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्टÑात काही ठिकाणी समाधानकारक तर काही ठिकाणी असमाधानकारक पाऊस झाला आहे; त्यामुळे काही ठिकाणी शेतीचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे; पण हे नुकसानग्रस्त भागांची तपासणी करण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या वतीने ‘अॅप’ची निर्मिती केली असून, त्याचे मुंबईत शुक्रवारीच उद्घाटन झाले.
या ‘अॅप’द्वारे महाराष्टÑात पडलेल्या पावसाचे गाव, मंडल, तालुका व जिल्हानिहाय मोजमाप करण्यात येत आहे. सलग २१ दिवस ज्या तालुक्यात पाऊस पडत नाही, असे तालुके संभाव्य दुष्काळसदृश यादीत समाविष्ट करण्यात येत आहेत, अशा राज्यातील २०० तालुक्यांत २१ दिवस पाऊस पडला नसल्याने केंद्राच्या निकषांप्रमाणे त्यांचा संभाव्य दुष्काळसदृश यादीत समाविष्ट करण्यात आला आहे.
या दुसऱ्या टप्प्यातील पाहणी सुरू करण्यात येत आहे. त्या पाहणीत त्या-त्या भागातील पर्जन्यमान, भूजल पातळी, जमिनीची आर्द्रता, पिकांची स्थिती यांचे उपग्रहामार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. याशिवाय निवडलेल्या तालुक्यांची तिसºया टप्प्यात प्रत्यक्ष पाहणी करून दि. २५ आॅक्टोबरपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असून दुष्काळजन्य परिस्थिती ३१ आॅक्टोबरपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर दुष्काळग्रस्त भागांना तातडीने मदत करण्यात येणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.