स्टेशन रोड की ‘लूटमारीचे केंद्र’
By Admin | Published: July 27, 2016 12:04 AM2016-07-27T00:04:16+5:302016-07-27T00:33:50+5:30
गुन्हेगारांना ‘अभय’ : फाळकुटदादा, वेश्या व्यवसाय, चक्रीजुगार, क्लबसारख्या अवैध धंद्यांत वाढ
एकनाथ पाटील --कोल्हापूर -परजिल्ह्यांतून येणाऱ्या व्यापाऱ्यांना हेरून त्यांना लुटण्याचा कट इथेच शिजतो. त्यामुळे स्टेशन रोडची ओळख आता ‘लूटमारीचे केंद्र’ अशी बनत चालली आहे. फाळकुटदादा, वेश्या व्यवसाय, तृतीयपंथीयांचा वावर, चक्रीजुगार, क्लब अशा अवैध धंद्यांचे आगर असलेल्या स्टेशन रोडला कोणी वाली आहे की नाही, असाच प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. अवैध धंद्यांवर विचारेमाळ, सदर बाजार, कावळा नाका, शिवाजी पार्क परिसरातील चार-पाच टोळ्यांचे वर्चस्व आहे. त्यांची शाहूपुरी पोलिस ठाण्यात नेहमी ऊठबस असते. दहशतीच्या जोरावर खाद्यविक्रेत्यांकडून हप्ता वसूल करणे हाच त्यांचा धंदा. त्यामुळे अशा लुटारू टोळ्यांनी स्टेशन रोड परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. लूटमारीच्या घटना वाढू लागल्याने व्यापारीवर्गाबरोबर सामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. स्टेशन रोड परिसरात मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन, खासगी ट्रॅव्हर्ल्स, हॉटेल-लॉज असल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांची नेहमी वर्दळ असते. मार्केट यार्ड, शाहूपुरी व्यापारी पेठेमुळे बाहेरगावाहून आलेले व्यापारी हॉटेल-लॉजवर उतरत असतात.
व्यापारीवर्गामुळे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असल्याने सराईत गुन्हेगारांचा वावर जास्त आहे. कावळा नाका, सदर बाजार, विचारेमाळ, शिवाजी पार्क या परिसराचे नाव काढले तरी अंगावर शहारा येतो. यापरिसरात सावकारी, मटका, जुगार, दारू आदी अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. येथील चार-पाच कुप्रसिद्ध टोळ्या अवैध धंद्यांचे नेटवर्क सांभाळत आहेत. सायंकाळी सहानंतर या टोळ्यांचा वावर स्टेशन परिसरात असतो. येथूनच ‘आंब्या’ची आखणी होते. रस्त्यावरून जाणारा नागरिक फोनवर काय बोलतो, एस. टी. बस व खासगी ट्रॅव्हल्समधून कोण उतरतोय, याची चाचपणी केली जाते. त्यानंतर चार-पाच नागरिक किंवा व्यापाऱ्यांना हेरून त्यांना लुटण्याचा प्लॅन आखला जातो. नुकतेच अशाप्रकारे हवालाचे तीस लाख रुपये मारहाण करून लुटलेत. या टोळ्यांनी एकप्रकारे पोलिसांना आव्हानच दिल्यासारखी स्थिती आहे. अंगावर घाण टाकणे, रस्त्यावर पाच-दहा रुपयांच्या नोटा विस्कटून पैसे पडल्याचे सांगून प्रवासी नागरिकांच्या बॅगा पळविणे. रात्रीच्या वेळी एकटे फिरणाऱ्या तसेच मोटारसायकलवरून जाणाऱ्या महिलांच्या आडवी गाडी मारून त्यांना अडविणे. चाकू गळ्याला लावून मोबाईल, दागिने लुटणे असे प्रकार या परिसरात वारंवार घडत आहेत. पोलिसांचा या परिसरात कोणताच धाक उरलेला नाही. काही पोलिस ‘तोडपाणी’ करण्यात गुंतल्याने ‘स्टेशन रोड परिसर म्हणजे आपल्या बापाचेच राज्य’ अशा अविर्भावात हे सराईत गुन्हेगार वावरत असतात. चार दिवसांत या परिसरात लूटमारीच्या घटनांनी कहरच केला आहे. स्टेशन परिसरातील चायनीजच्या गाड्यांसमोर कमरेला धारदार शस्त्रे लावून या टोळ्या आजही फिरतात. वारसा हक्काप्रमाणे ही गुन्हेगारी फोफावत असून त्याला वेळीच चाप लावणे गरजेचे आहे.
घटनाक्रम : स्टेशन रोडवरील लूटमारीचा थरार, टोळ्यांचे वर्चस्व अंडाबुर्जी विक्रेते रसिफ शेख यांच्यावर बिलावरून खुनी हल्ला.
प्रसाद रामचंद्र कामटे
(रा. ताराबाई पार्क ) यांच्या कारमधून बॅग लंपास.
चंद्रप्रभा प्रल्हाद रावरकर
(रा. अकोला) यांच्या पर्समधून १० हजार रुपये लंपास.
प्रवासी पंकज जीवराजभाई पारधी (रा. गुजरात) यांचा मोबाईल व रोख रक्कम लुटली.
कारखानदार कुणाल विनोद देशपांडे (रा. खरी कॉर्नर)
कारमधून अडीच लाख रुपये लंपास.
बाळासो शंकर गुजर (रा. मुंबई) या व्यावसायिकाचे अडीच लाख किमतीचे सोन्याचे दागिने लंपास.
आयकर विभागाच्या राजापुरातील कॉन्ट्रॅक्टर एम. त्रिपाल रेड्डी
यांच्या कारमधून साडेतीन लाखांची रोकड लंपास.
बालाजी रामचंद्र मद्देवाड
(रा. लातूर) यांची लॉजमधून कमती वस्तूची बॅग लंपास.
अभिजित अशोक चौगुले (रा. राजारामपुरी) यांचा कारमधून लॅपटॉप लंपास.
अनुराधा सतीश कुलकर्णी (रा. शिवाजी पार्क) यांच्या
मोपेडच्या डिक्कीतून रोख २० हजार व सोन्या-चांदीचे दागिने लंपास.