यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे २२ जानेवारीला अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:21 AM2021-01-02T04:21:33+5:302021-01-02T04:21:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा परिषदेसमोर उभारण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा परिषदेसमोर उभारण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते २२ जानेवारी २०२१ रोजी करण्यात येणार आहे. अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील आणि बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी ३९ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
अध्यक्ष पाटील म्हणाले, शुक्रवारी (दि. २२) सकाळी साडेदहा वाजता हा समारंभ होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सकाळीच हा कार्यक्रम ठरल्याची माहिती दिली. त्यानुसार नियोजनास सुरुवात केली. उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजातून ३९ रुग्णवाहिका घेण्यास मंत्री मुश्रीफ यांनी मान्यता दिली आहे. पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह अन्य मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे. यावेळी बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, समाजकल्याण सभापती स्वाती सासने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.
चौकट
अनेक वर्षांचे स्वप्न साकार
व्ही. बी. पाटील म्हणाले, कोल्हापुरात विजयसिंह पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान स्थापन करून तत्कालीन मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांना अध्यक्ष केले. चव्हाण यांचा पुतळा उभारण्याचे स्वप्न अनेक वर्षे अपुरे राहिले. मात्र, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अशोक पोवार, रमेश मोरे यांच्या मागणीनंतर तत्कालीन अध्यक्षा शौमिका महाडिक आणि अन्य पदाधिकारी, सदस्यांनी पुतळा बसविण्यास मान्यता दिली. अशोक पोवार म्हणाले, व्ही. बी. पाटील यांच्या सहकार्याशिवाय हा पुतळा तयार करणे शक्य नव्हते. हा पुतळा संजय तडसरकर यांनी केला आहे.