कोल्हापूरच्या रेल्वेचा ‘अपेक्षां’च्या प्लॅटफॉर्मवरच मुक्काम
By Admin | Published: April 20, 2016 12:13 AM2016-04-20T00:13:56+5:302016-04-20T01:13:30+5:30
शतकोत्तर रौप्यमहोत्सव पूर्ण : लोकप्रतिनिधींनी सुविधांसह रेल्वे विस्तारीकरणासाठी गती देण्याची गरज
कोल्हापूर : पर्यटन, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, आदी विविध क्षेत्रांतील जिल्ह्याची विकासवाहिनी आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कोल्हापूरच्या रेल्वे सेवेने १२५ वर्षे पूर्ण केली तरी आवश्यक त्या प्रमाणात तिचा विकास झालेला नाही. नव्या रेल्वे, नवी स्टेशन इमारत, मॉडेल स्टेशन म्हणून विकास, अशा विविध अपेक्षांच्या प्लॅटफॉर्मवरच कोल्हापूरची रेल्वे सेवा थांबून आहे.
राजर्षी शाहू महाराज यांनी २० एप्रिल १८९१ रोजी कोल्हापूर-मिरज रेल्वेचा प्रारंभ केला. ही रेल्वे सेवा आज, बुधवारी शतकोत्तर रौप्यमहोत्सव पूर्ण करीत आहे. त्यानिमित्त संबंधित रेल्वे सेवा आणि स्थानकाची वाटचाल व स्थितीचा ‘लोकमत’ने घेतलेला हा आढावा.
सन १८९१ नंतर या रेल्वे सेवेच्या माध्यमातून कोल्हापूर पुढे अनेक शहरांना जोडले गेले. यातून जिल्ह्याच्या पर्यटन, शिक्षण, उद्योग-व्यवसाय, वाहतूक, आदी क्षेत्रांना बळ देत विकासाला हातभार लावत रेल्वे धावू लागली. रोज मध्य रेल्वेला ७० लाखांहून अधिक उत्पन्न देणारे कोल्हापूर हे पुणे विभागात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
चांगले उत्पन्न देऊनही रेल्वे सेवा अजूनही अधिकतर स्वरूपात अपेक्षांच्या प्लॅटफॉर्मवर थांबून आहे. कोल्हापूर-पुणे मार्गाचे विद्युतीकरण व दुहेरीकरण व्हावे, कोल्हापूर-मुंबई सुपरफास्ट रेल्वे, सांगली-कोल्हापूर शटलसर्व्हिस, कोल्हापूर-दिल्ली आणि कोल्हापूर-अहमदाबाद रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरू व्हावी, कोल्हापूर-तिरुपती रेल्वे पंढरपूर, सोलापूर मार्गे जावी, अशा लहान-मोठ्या अपेक्षांच्या पूर्तीच्या प्रतीक्षेत कोल्हापूरकर आहेत. सुविधांच्या कमतरतेचे अडथळे असूनही रेल्वे सेवेला विकासाच्यादृष्टीने गती देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
मॉडेल स्टेशन होणे आवश्यक
कोल्हापूर हे येत्या पाच-दहा वर्षांत कोकण रेल्वेला जोडले जाईल. त्यामुळे रेल्वे स्थानकाला मोठ्या इमारतीची गरज भासणार आहे. शिवाय प्रवाशांसाठी आवश्यक सुविधांची पूर्तता करावी लागणार असल्याचे पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी सांगितले. ते म्हणाले, सन २००३ मध्ये तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर रेल्वेस्थानकाचे नामांतर करून ‘श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस’, असे करण्यात आले. यावेळी तत्कालीन रेल्वेमंत्री नीतिशकुमार यांनी ‘मॉडेल स्टेशन’ची घोषणा केली. त्याला मान्यता मिळवूनही काहीच कार्यवाही झाली नाही. सध्याची गरज पाहता मॉडेल स्टेशन होणे आवश्यक आहे.
प्लॅटफॉर्मची
उंची वाढली
रेल्वेमार्गाचे सन १९७१ मध्ये मीटर गेजमधून ब्रॉडगेजमध्ये झालेले रूपांतर वगळता आजपर्यंत स्थानक आणि सेवेला बळ देणारे ठोस असे काहीच झालेले नाही. सध्या स्टेशनमधील प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचे काम झाले आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक तीनची शेड उभारणी, शाहूपुरी भाजी मंडई ते प्लॅटफॉर्म क्रमांक दोनला जोडणारा उड्डाणपूल आणि तिकीट खिडकी उभारणीचे काम सुरू आहे.
पॅसेंजर्स असोसिएशनकडून आज वाढदिवस
रेल्वेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या पूर्ततेनिमित्त आज, बुधवारी दुपारी साडेबारा वाजता महाराष्ट्र रेल्वे व रोड पॅसेंजर्स असोसिएशन व रौप्यमहोत्सव समारोह समितीतर्फे वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते केक कापला जाणार आहे. त्यानंतर रेल्वेच्या अधिकारी व व्यापाऱ्यांसमवेत बैठक होणार असल्याची माहिती मोहन शेटे यांनी दिली.