‘सुकाणू’ नव्हे सुकलेली समिती : सदाभाऊ खोत यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 06:46 PM2017-10-18T18:46:40+5:302017-10-18T18:51:09+5:30
कर्जमाफीवर टीका करणाºया सुकाणू समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सत्ता आहे, त्यांनी तिथे कर्जमाफी द्यावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे, असा इशारा देत सुकाणू समिती म्हणजे सुकलेली समिती असल्याची टीका कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
कोल्हापूर , दि. १८ : कर्जमाफीवर टीका करणाºया सुकाणू समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सत्ता आहे, त्यांनी तिथे कर्जमाफी द्यावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे, असा इशारा देत सुकाणू समिती म्हणजे सुकलेली समिती असल्याची टीका कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
कर्जमाफीतील शेतकऱ्याचा सत्कार मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज्यमंत्री खोत यांनी सुकाणू समितीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर टीका केली.
खोत म्हणाले, राज्य सरकारने कर्जमाफीचे पैसे दिवाळीपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्याबाबतचा ‘शब्द’ पाळला आहे. एकराची अट नाहीच सरसकट दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ होणार आहे, पण सुकाणू समितीला ते मान्य नसल्याची चर्चा आहे.
या समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सरकार आहेत. त्यांनी तिथे कर्जमाफी करावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे. तिथे दमडीही दिलेली नाही, काही न करता उगीच टीका करायची, डोळ्यावर काळा चष्मा घातलेल्यांना उजेड कसा दिसणार. कर्जमाफीबाबत निर्णय घ्यायला सुकाणू समिती सरकार नसल्याची टीकाही त्यांनी केली.
ज्या कारखान्यांनी अंतिम ऊस बिले दिलेली नाहीत, त्यांना गाळप परवाना दिला जाणार नाही. त्यामुळे अंतिम बिलाचा प्रस्ताव त्यांना सादर करावाच लागेल. यंदा देशाला जेवढी साखरेची गरज आहे, तेवढेच उत्पादन होणार आहे, त्यात साखरेचे दर सध्या तरी चांगले असल्याने यंदा एफआरपीपेक्षा जादा पैसे उत्पादकांना मिळतील असे अपेक्षित आहे.
ऊसदर कोणी मागतो म्हणून नव्हे तर साखरेचा बाजारातील भावावर मिळतो. मी म्हणेल तेवढा दर द्यायचा म्हटला तर कारखान्यांचे काय होईल, हे सगळ्यांना माहिती असल्याची टीकाही त्यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली.
ऊस दराबाबत लवकरच बैठक
महाराष्ट्रतील ऊस गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ऊस दराबाबत चर्चा करण्यासाठी तत्पूर्वी साखर कारखानदार, शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक बोलवावी, अशी मागणी रयत संघटनेच्या वतीने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे.
योग्य तोडगा न निघाल्यास संघर्ष
ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी आमचा प्रयत्न राहील; पण योग्य तोडगा निघाला नाही तर रयत संघटना संघर्ष करण्यास रस्त्यावर उतरेल, असा इशाराही खोत यांनी दिला.