महागाईत किंचितसा दिलासा! स्टील १२ हजारांनी स्वस्त; घराचे स्वप्न पूर्ण होणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 01:06 PM2022-04-18T13:06:28+5:302022-04-18T13:06:45+5:30
स्टीलची दरवाढ झाल्यानंतर लगेच घरांचे दर वाढले. आता स्टील १२ हजार रुपयांनी उतरल्याने घराच्या किमती कमी होऊन गृहस्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार का? अशी विचारणा ग्राहकांतून होत आहे.
संतोष मिठारी
कोल्हापूर : डिझेल दरवाढ आणि अन्य काही कारणांमुळे बांधकामासाठी लागणारे स्टील प्रतिटन ८४ हजार रुपयांवर गेले होते. सध्या ते ७२ हजार रुपयांवर आले आहे. स्टीलची दरवाढ झाल्यानंतर लगेच घरांचे दर वाढले. आता स्टील १२ हजार रुपयांनी उतरल्याने घराच्या किमती कमी होऊन गृहस्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार का? अशी विचारणा ग्राहकांतून होत आहे.
मार्चमध्ये स्टीलचा दर प्रतिदिन ८४ हजार रुपयांवर पोहोचला होता. स्टीलपाठोपाठ सिमेंट, मातीच्या विटा, सिमेंट विटा, खडी, वाळू, आदी बांधकाम साहित्याच्या दरातही १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. गेल्या दहा दिवसांत टप्प्याटप्प्याने स्टीलचा दर कमी होत सध्या तो ७२ हजार रुपये प्रतिटन इतका झाला आहे. मात्र, अन्य बांधकाम साहित्याचे दर कमी झालेले नाहीत.
एका टनाचा दर ७२ हजार
कोल्हापूर जिल्ह्यात मार्चमध्ये स्टीलचा दर प्रतिटन ८४ हजार रुपयांवर पोहोचला होता. एप्रिलच्या सुरुवातीपासून दर कमी होण्यास सुरुवात झाली. आता एका टनाचा दर ७२ हजार रुपये आहे.
घरांच्या किमती कमी होणार का?
स्टीलसह इतर बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाल्याने घरांच्या किमती वाढल्या. सध्या स्टील बारा हजारांनी स्वस्त झाल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. पण, विटा, सिमेंट, वाळू, खडी आदी साहित्याचे दर कमी झालेले नाहीत. त्यामुळे घरांच्या किमती कमी होण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही. केंद्र, राज्य सरकारने बांधकाम साहित्याच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवल्यास बांधकाम व्यावसायिकांच्या खर्चात बचत होईल. त्यामुळे घरांच्या किमती कमी होण्यास मदत होईल. त्यादृष्टीने सरकारने लवकर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे क्रेडाई, कोल्हापूरचे सचिव प्रदीप भारमल यांनी रविवारी सांगितले.
बांधकाम साहित्याचे भाव
सिमेंट - ३५० ते ३८०
मातीच्या विटा - ७ ते १२ रुपये (प्रतिनग)
सिमेंटच्या विटा-६५ रुपये (प्रतिनग)
खडी- २४०० रुपये (प्रतिब्रास)
वाळू (क्रश सँड)- ४००० रुपये (प्रतिब्रास)
वॉश क्रश सँड-६००० रुपये (प्रतिब्रास)
गेल्या दहा दिवसांत टप्प्याटप्प्याने स्टीलचे दर कमी झाले आहेत. सध्या ७२ हजार रुपये प्रतिटन दर आहे. आणखी दर कमी होईल, अशी अपेक्षा असल्याने ग्राहकांची सध्या स्टील खरेदीबाबत काहीशी ‘वेट अँड वॉच’ भूमिका आहे. -जयंती पटेल, स्टील विक्रेते