कोल्हापूर सेंट झेव्हिअर्समध्ये जुन्या आठवणींचा दरवळ : हीरक महोत्सव दिमाखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 01:02 AM2017-12-10T01:02:54+5:302017-12-10T01:04:21+5:30
कोल्हापूर : येथील सेंट झेव्हिअर्स या शाळेचा हीरकमहोत्सवी सोहळा शनिवारी अत्यंत दिमाखदारपणे साजरा झाला.
कोल्हापूर : येथील सेंट झेव्हिअर्स या शाळेचा हीरकमहोत्सवी सोहळा शनिवारी अत्यंत दिमाखदारपणे साजरा झाला. त्यानिमित्त गेल्या साठ वर्षांतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा भरला. जुन्या-नव्या आठवणींनी शाळेचा परिसर पुन्हा एकदा पुलकित झाला. यावेळी ‘झेसाकॉप’ या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने शाळेसाठी दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. शाळेच्या मदतीसाठी नुसता आवाज द्या, आम्ही सगळे धावून येऊ, अशी ग्वाही माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष उद्योगपती दिलीप मोहिते यांनी दिली.
शाळा व माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सकाळी दहा वाजता त्याची सुरुवात झाली. सर्व माजी विद्यार्थी ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत मिरवणुकीनेच शाळेत आले. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना झाली. सुमारे अडीच हजार विद्यार्थी या सोहळ्यास उपस्थित होते. त्यामुळे शाळेचा परिसर निळी जर्सी घातलेल्या विद्यार्थ्यांनी फुलून गेला. त्यामध्ये विद्यार्थिनींची संख्याही लक्षणीय होती. शाळेचे ते जुने दिवस, त्यावेळच्या आठवणी व एकमेकांबद्दलच्या भावनांना सर्वांनीच पुन्हा उजाळा दिला. जुने मित्र-मैत्रिणी भेटल्यावर जीवनाच्या त्या टप्प्यावर अनेकजण रेंगाळले.
माजी विद्यार्थी संघटनेचे चीफ पेट्रन व दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शाळेचे सारेच विद्यार्थी चमकणाºया ताºयाप्रमाणे असून, या शाळेमुळेच आमचे जीवन घडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शाळेच्या १९७७ चे माजी मुख्याध्यापक फादर बर्टी रोझारिओ यांनीही या शाळेचा विद्यार्थी कायमच देशाचे नाव उज्ज्वल करील अशा भावना व्यक्त केल्या. या शाळेत झालेल्या चांगल्या संस्कारांमुळे आम्ही जीवनात यशस्वी झाल्याचे मोहिते यांनी सांगितले.
यावेळी डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे प्रमुख डॉ. संजय पाटील, आमदार सतेज पाटील, त्यांची बहीण भाग्यश्री पाटील, ऋतुराज पाटील यांच्यासह उद्योगपती विजय मेनन, भरत जाधव, भरत ओसवाल, दीपक गदे्र, शिवप्रसाद पाटील, अमरदीप पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापुरातील सेंट झेव्हिअर्स शाळेचा शनिवारी हीरकमहोत्सव साजरा झाला. त्यावेळी सर्व माजी विद्यार्थी मिरवणुकीने या सोहळ्यात सहभागी झाले. दुसºया छायाचित्रात शाळेचे माजी विद्यार्थी असलेले आमदार सतेज पाटील हे यावेळी फुटबॉल खेळण्यात चांगलेच रंगले होते.