लमाण समाजाचे एक पाऊल पुढे; हुंडाबंदीचा निर्धार-: टोकाचा विरोध झुगारून चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 01:10 AM2019-02-27T01:10:55+5:302019-02-27T01:11:14+5:30

नसिम सनदी । कोल्हापूर : लग्नासारख्या पवित्र बंधनासाठी कर्जबाजारी करणाऱ्या वर्षानुवर्षांच्या सामाजिक चालीरीती आणि परंपरांचे जोखड खाली उतरविण्यासाठी लमाण ...

 A step ahead of society; The determination of dowry- | लमाण समाजाचे एक पाऊल पुढे; हुंडाबंदीचा निर्धार-: टोकाचा विरोध झुगारून चांगला प्रतिसाद

लमाण समाजाचे एक पाऊल पुढे; हुंडाबंदीचा निर्धार-: टोकाचा विरोध झुगारून चांगला प्रतिसाद

googlenewsNext
ठळक मुद्देसुधारणेची कास ; कर्जाच्या खाईतून बाहेर येण्याचा प्रयत्न

नसिम सनदी ।
कोल्हापूर : लग्नासारख्या पवित्र बंधनासाठी कर्जबाजारी करणाऱ्या वर्षानुवर्षांच्या सामाजिक चालीरीती आणि परंपरांचे जोखड खाली उतरविण्यासाठी लमाण समाज सज्ज झाला आहे. विशिष्ट प्रकारच्या कपड्यांचा हट्ट सोडल्यानंतर आता ‘हुंंडा देणार नाही, घेणारही नाही,’ असे ठणकावून सांगत त्यांनी सुधारणेच्या मार्गावर पहिले पाऊल टाकले आहे.

मुकादमाच्या जीवावर पोटासाठी फिरता संसार थाटणाऱ्या या समाजाने हुंड्यासारख्या प्रथेला मूठमाती देण्याचा निर्धार करून अन्य भटक्या-विमुक्त समाजांसमोर आदर्श ठेवला आहे. कितीही कायदे झाले तरी चालीरीतींच्या आडून हुंड्याची प्रथा सुरूच आहे. हुंडा नाही म्हणून लग्न मोडलेली आणि लग्नच न झालेली उदाहरणे जागोजागी दृष्टीस पडतात. याला अपवाद तांड्यावर राहणारा भटका लमाण समाजही नाही. वर्षानुवर्षे बकाल आयुष्य जगणाºया या समाजाच्या डोक्यावर हक्काचे छप्पर नाही, की हक्काचा रोजगार, ना स्वत:ची जमीन. मिळेल ते काम करून रोजची गुजराण करणाºया या समाजात हुंड्याने मात्र खोलवर हातपाय पसरले आहेत.

सोने, नाणे आणि रोख पैसा दिल्याशिवाय लग्नाची बोलणीच होत नाहीत. कमीत कमी चार ते पाच तोळे सोने, आणि रोख किमान लाखात रक्कम जातपंचायत ठरवूनच देते. श्रीमंत असो वा गरीब; मुलीच्या लग्नासाठी बापाला ५ ते १० लाख रुपये खर्च करावाच लागतो. रोजची खायची भ्रांत असणाºया या समाजात मग पैसे जमविण्यासाठी मुकादमाकडून अ‍ॅडव्हान्स घेतला जातो. लग्नानंतर त्याची परतफेड काम करून केली जाते. मुलीच्या बापाच्या वाट्याला आयुष्यभराचे कामच येते.

ही परिस्थिती पाहतच मोठे झालेल्या काहींनी सुधारणेची कास धरण्याचा निर्णय घेतला आणि सुरू झाला या समाजातील हुंडा या सर्वांत अनिष्ट प्रथा बंद पाडण्याचा उपक्रम. टोकाचा विरोध झाला; पण समाजाचे संत सेवालाल यांचीच शपथ घालून भावनिक साद घालत मन वळविण्यास सुरुवात झाली. याला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शासकीय सुविधांपासून वंचित
लमाण समाज हा मूळचा सोलापूरच्या दुष्काळी पट्ट्यातील. पिढ्यान्पिढ्या कष्टाची कामे करणारा हा समाज महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रभर स्थलांतरित झाला. विहीर खुदाई, रस्ते, गटारी, पाईपलाईन खुदाई, गवंडी, सेंट्रिंग अशी अंगमेहनतीची कामे करून या समाजात उदरनिर्वाह केला जातो. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन पिढ्यांपासून लमाण समाज कायमस्वरूपी वस्ती करून राहत आहे. महाराष्ट्राचे रहिवासी असतानाही जातीच्या दाखल्यापासून ते घरकुलापर्यंतची कोणतीही सुविधा त्यांना अजून नाही.

 

माझ्या स्वत:च्या बहिणीचा संसार हुंड्यामुळे उद्ध्वस्त झाला. हुंड्याला नकार दिल्याने मुलगीचे लग्न लांबले. अखेर समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे हुंडा देऊन लग्न लावून दिले; पण मनाला कायम सल बोचत राहिली. यातूनच संघटना उभी राहिली. मराठा महासंघाच्या कार्याने प्रेरित होऊन समाजसुधारणेचा ध्यास घेतला. त्यातूनच हुंडाबंदीसारखा निर्णय पुढे आला. नशाबंदीचाही निर्णय घेतला.
- रामचंद्र पोवार, लमाण संघटनेचे नेते

Web Title:  A step ahead of society; The determination of dowry-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.