कदम खूनप्रकरण; सख्ख्या भावांना जन्मठेप

By Admin | Published: January 7, 2015 12:13 AM2015-01-07T00:13:15+5:302015-01-07T00:27:38+5:30

सांगलीवाडीतील प्रकरण : माजी नगरसेविकेसह दोघे निर्दोष

Step murder; Life imprisonment for younger brothers | कदम खूनप्रकरण; सख्ख्या भावांना जन्मठेप

कदम खूनप्रकरण; सख्ख्या भावांना जन्मठेप

googlenewsNext

सांगली : सांगलीवाडी येथील उदय आकाराम कदम (वय २४) या तरुणाच्या खूनप्रकरणी चार संशयितांपैकी दोघांना दोषी धरून जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. परशुराम बाबू बलवाड (३०) व रमेश बाबू बलवाड (रा. शिरहट्टी, ता. अथणी) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही सख्खे भाऊ आहेत.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. जी. धमाळ यांनी आज, मंगळवारी हा निकाल दिला. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. भगतसिंग राजपूत यांनी काम पाहिले. यात मुख्य संशयित संजय हंबीरराव कदम (वय ३२) व त्याची आई माजी नगरसेविका कुसूम कदम (५८, सांगलीवाडी) यांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित असलेल्या या खटल्याचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. निकाल ऐकण्यासाठी सांगलीवाडीतील नागरिकांनी गर्दी केली होती. सकाळी साडेअकराला न्यायालयाने निकाल दिला. त्यानंतर बलवाड बंधूंना पोलीस बंदोबस्तात तातडीने सांगलीच्या कारागृहात हलविण्यात आले.
अनैतिक संबंधाच्या संशयावरून उदय कदम याचा २१ मार्च २००९ रोजी भरदिवसा खून करण्यात आला होता. उदयच्या शेतातच त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या अंगावरील दागिने गायब झाले होते. अत्यंत गुंतागुंत व आव्हानात्मक बनलेल्या या खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांना आठ दिवस लागले होते. त्यानंतर बलवाड बंधू, कुसूम कदम, संजय कदम यांची नावे निष्पन्न झाली होती. या चौघांना अटक केली होती. बलवाड बंधू संशयित कदम यांच्याकडे शेतगडी म्हणून काम करीत होते. कुसूम व संजय कदम काही दिवसांनंतर जामिनावर बाहेर आले होते, तर बलवाड बंधूंना जामीन मिळाला नाही. खटल्यात २६ साक्षीदार तपासण्यात आले. घटनेनंतर बलवाड बंधूंनी उदयच्या अंगावरील लंपास केलेले दागिने पोलिसांनी जप्त केले होते. उदयचा मोबाईलही त्यांनी लंपास केला होता. यामध्ये त्यांनी स्वत:चे सीमकार्ड घालून त्यावरून संशयित संजय कदम याच्याशी संभाषण केल्याचा महत्त्वाचा पुरावा अ‍ॅड. राजपूत यांनी न्यायालयात सादर केला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक सातपुते यांनी याचा तपास केला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Step murder; Life imprisonment for younger brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.