विधायक गणेशोत्सवाच्या दिशेने कागलचे पाऊल
By admin | Published: August 6, 2016 12:42 AM2016-08-06T00:42:34+5:302016-08-06T00:43:25+5:30
‘डॉल्बीमुक्ती’साठी पुढाकार : समरजितसिंह घाटगे यांचे विशेष प्रयत्न
कोल्हापूर : कागल म्हटले की, पटकन नजरेसमोर येते ते गटा-तटांचे कट्टर राजकारण. पण, याव्यतिरिक्त कागलची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी यावर्षी विधायक आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या दिशेने पाऊल पडणार आहे. यासाठी शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू महाराज यांना अभिप्रेत असणारा गणेशोत्सव साजरा होऊन संस्कृती जपण्यासाठी गट-तट विसरून सर्वांनी ‘डॉल्बीमुक्ती’साठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
या प्रयत्नाबाबत अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्यामागील मूळ उद्देशच हरविला आहे. गणेशोत्सवात महिलांचा कमी झालेला सहभाग, तरुण मंडळांमध्ये ईर्ष्या व प्रतिष्ठेचा बनलेला डॉल्बीचा वापर आणि त्याबरोबर कार्यकर्त्यांकडून वाढलेले मद्यप्राशनाचे प्रमाण हे चित्र जिल्ह्णातील अधिकतर ठिकाणी दिसत आहे. डॉल्बीच्या वापरामुळे ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. यातून खरे तर गणपतीबाप्पांचा अपमानच होतो. कागल तालुक्यातील हे चित्र बदलावे, अशी राजेसाहेबांची इच्छा होती. ते लक्षात घेऊन एक राजकीय विद्यापीठ ते सांस्कृतिक विद्यापीठ अशी कागलची ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने कागलमध्ये यावर्षीचा गणेशोत्सव ‘डॉल्बीमुक्त’ व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यात आमच्या राजेगटाच्या तरुण मंडळांनी डॉल्बीला फाटा देण्याचे ठरविले आहे. तसेच विविध कार्यक्रमांनिमित्त तालुक्यातील ज्या गावात जातो, तेथील मंडळांना डॉल्बीमुक्तीसह विधायक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवाहन करीत आहे. शाहू महाराज यांचा नात्याने व विचारांचा वारसदार असल्याने विधायक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी मी प्रयत्न सुरू केला आहे. त्याला निश्चितपणे कागलची जनता पाठबळ देईल, असा विश्वास आहे.
डॉल्बीमुक्तीचे हमीपत्र
डॉल्बीमुक्तीसाठी मी करीत असलेल्या आवाहनाला कागल, मुरगूड, कसबा सांगाव, आदी परिसरांतील अनेक मंडळांनी प्रतिसाद दिला असल्याचे अध्यक्ष घाटगे यांनी सांगितले. ते म्हणाले, आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या तरुण मंडळांचा एकत्रितपणे दि. १५ आॅगस्टनंतर कार्यक्रम घेणार आहे. या मंडळांना विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉल्बीमुक्त व विधायक गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे हमीपत्र देण्यात येणार आहे.
वेगळा आदर्श निर्माण करावा
गेल्या काही निवडणुकांच्या दरम्यान गणेशोत्सवातील डॉल्बीचा वापर, पैशांचा झालेला चुराडा सर्वांनीच पाहिला आहे. यावर्षी कागल नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर तरुण मंडळांनी डॉल्बीमुक्त आणि विधायक गणेशोत्सव साजरा करून जिल्ह्यामध्ये वेगळा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन अध्यक्ष घाटगे यांनी केले आहे.