पावसाची ओढ.. जीवाला घोर; कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप ३० टक्केच पेरणी, धरणात किती पाणीसाठा.. जाणून घ्या
By राजाराम लोंढे | Published: June 19, 2024 01:42 PM2024-06-19T13:42:14+5:302024-06-19T13:44:14+5:30
शहरात आज हलक्या सरी कोसळल्या, उद्या, गुरुवारपासून जिल्ह्यात पावसाची शक्यता
कोल्हापूर : मान्सून वेळेवर सुरू झाल्याने आनंदित असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सध्या चिंतेची झटा दिसत आहे. रोज उठले की पांढऱ्या आकाशाकडे पाहिले की रात्री झोप येत नाही. खरीप पिकांची उगवण झाली, पण जोरदार पाऊस नाही. जिल्ह्यात अद्याप १ लाख ९२ हजार ६३३ हेक्टर पैकी केवळ ५८ हजार ९४१ हेक्टरवर (३० टक्के) खरीपाची पेरणी झाली आहे.
यंदा मान्सून सरासरीपेक्षा अधिक होईल, असा अंदाज हवामान विभाग गेली महिना-दीड महिना वर्तवत आहे. गेल्या वर्षी दुष्काळाने होरपळलेल्या शेतकरी मान्सूनकडे डोळे लावून बसला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनने वेळेवरच एंट्री घेतली. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू झाल्याने शेतकरी काहीसा आनंदित होता. खरीप पूर्व मशागतीला वेग आला.
त्यानंतरच्या चार-पाच दिवसात पाऊस राहिल्याने पेरण्या धुमधडाक्यात सुरू राहिल्या. मात्र, गेल्या आठवड्यापासून मान्सूनने काहीशी दडी मारली आहे. वळवासारखा पडेल त्या ठिकाणीच पडेल असा पाऊस हाेत आहे. भात, भुईमूग, सोयाबीनची उगवण झाली आहे, या पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. मात्र, रोज उठले की पांढरे आकाश पहावयास मिळत आहेत.
मंगळवारी सकाळी नऊपासूनच अंग भाजून काढणारे ऊन होते. साडेदहा वाजता तर अंगाकडून घामाच्या धारा वाहत होत्या. कमाल तापमान ३४ तर किमान २३ डिग्रीपर्यंत राहिल्याने वातावरणात कमालीचा उष्मा राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाने ओढ दिल्याने खरीपाच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ३० टक्के पेरणी झाली आहे.
गुरुवारपासून पावसाची शक्यता
उद्या, गुरुवारपासून जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानंतर कमी अधिक राहण्याची शक्यता आहे.
राधानगरी, काळम्मावाडी धरणात किती पाणीसाठा..
कोल्हापूर शहराची तहान भागविणाऱ्या राधानगरीधरणात आज अखेर २.०० टी. एम.सी पाणी साठा उपलब्ध आहे. ८ टी. एम.सी.पाणी क्षमता असलेल्या राधानगरी धरणात सध्या ५६.६६ दलघमी पाणी साठा शिल्लक असून गतवर्षी याचा दिवसी धरणात ४८.०७ दलघमी म्हणजेच १.७० टी एम सी पाणी शिल्लक होते. धरणातून आजच्या घडीला ३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात चालू आहे. १ जून ते आज अखेर धरण क्षेत्रात २२३ मी. मि पावसाची नोंद झाली आहे.
काळम्मावाडी धरणात अवघे ३.१४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. ८८. ८९ दलघमी पाणी साठा आहे. धरणात अवघे १२.३६ टक्के पाणी उपलब्ध आहे. तुळशी जलशयात १. २७ टी एम सी, ३५.९६ दलघमी पाणी साठा शिल्लक आहे.
पीकनिहाय झालेली पेरणी, हेक्टरमध्ये अशी :
पीक - एकूण पेरक्षेत्र - प्रत्यक्षात पेरणी - टक्केवारी
भात - ९२ हजार ३२० - ३२ हजार ६०२ - ३५
ज्वारी - ९३७ - १६५ - १७
नागली - १७ हजार १०० - १ हजार ४४ - ६
मका - १३० - २८ - २१
भुईमूग - ३५ हजार ३१२ - ९ हजार २२० - २६
सोयाबीन - ४२ हजार २७४ - १५ हजार ७४० - ३७
कडधान्य - ३ हजार ७९० - ११३ - २