अजूनही ‘डाळ’ शिजेना!

By admin | Published: August 23, 2016 12:12 AM2016-08-23T00:12:28+5:302016-08-23T00:31:12+5:30

दर वाढलेलेच : दुष्काळामुळे गतवर्षी डाळींचे उत्पादनच कमी

Still 'dal'! | अजूनही ‘डाळ’ शिजेना!

अजूनही ‘डाळ’ शिजेना!

Next

कोल्हापूर : अन्न या मूलभूत घटकांत समाविष्ट असलेल्या तूरडाळीचे दर अद्याप वाढलेलेच असल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातून अजूनही तूरडाळ हद्दपारच आहे. चांगला पाऊस झाल्याने गेल्या काही दिवसांत डाळींचे दर घाऊक बाजारपेठेत कमी झाले असले तरी अद्याप किरकोळ बाजारपेठेतील दरात फारशी घसरण झालेली नाही. त्यामुळे ग्राहकांचे तूरडाळ खरेदीचे प्रमाण कमी आहे. त्याचा परिणाम व्यापारीवर्गावरही झाला आहे.
घरगुती जेवणात तुरीची डाळ प्रामुख्याने वापरली जाते. त्यापाठोपाठ मूगडाळीसह अन्य डाळींचा क्रम लागतो. मात्र, गतवर्षी सर्वत्र दुष्काळाचे सावट असल्याने डाळींचे उत्पादनच कमी झाले होते. त्यामुळे कधी नव्हे ते तूरडाळीने २०० रुपये किलोचा दर गाठला. त्यामुळे नागरिकांनी तूरडाळ खरेदी करणेच जवळपास बंद केले होते. त्यामुळे घरगुती जेवणातून तूरडाळीची आमटी, उसळ हे पदार्थ हद्दपारच झाले. त्याला पर्याय म्हणून मूगडाळीचा वापर होतो; पण तूरडाळीचा परिणाम म्हणून मूगडाळ, मसूरडाळ, हरभरा डाळ आणि उडिद डाळीचेही दर १०० ते १८० च्या दरम्यान वाढल्याने डाळी खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. वाढलेल्या महागाईमुळे कुटुंबाचे बजेट कोलमडले आहे.
निसर्गाच्या कृपेने जून महिन्यापासून राज्यात चांगला पाऊस झाला आहे. अजूनही पावसाळा असल्याने डाळींच्या उत्पादनाची हमी आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारपेठेत डाळींचे दर कमी झाले आहेत. असे असले तरी किरकोळ (रिटेल) विक्रीत अद्यापही तूरडाळ मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आलेली नाही. मात्र, येत्या काही दिवसांत डाळींचे दर कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने ऐन सणांच्या तोंडावर ही सर्वसामान्यांसाठी शुभवार्ताच म्हणावी लागेल.

तरीही दर जास्त का?
गेल्या काही दिवसांत डाळींचे दर कमी झाल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्ष बाजारपेठेत त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. व्यापाऱ्याने घाऊक बाजारात वाढलेल्या दराने क्विंटलच्या प्रमाणात डाळींची खरेदी केलेली असते. मात्र, नंतर दर कमी व्हायला लागतात. कोणताही व्यापारी नुकसानीत जाऊन धंदा करत नाही. व्यापाऱ्याने पूर्वी हाच माल जास्त रकमेत खरेदी केलेला असल्याने तो साठा संपेपर्यंत चढ्याच दराने डाळींची विक्री होते. त्यानंतर उतरलेले दर लागू केले जातात. त्यामुळे उतरलेल्या दराचे तत्काळ परिणाम किरकोळ बाजारपेठेत दिसत नाहीत. +


महाअवयव दानाची होणार ‘जनजागृती’
३० आॅगस्ट ते एक सप्टेंबर अभियान : नियोजनासाठी जिल्हाधिकारी सैनी यांची बैठक
कोल्हापूर : अवयव दान हे श्रेष्ठदान असून, अवयव दानाबद्दल जनजागृती करण्यासाठी ३० आॅगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीमध्ये महाअवयव दान अभियान हाती घेण्यात आले आहे. हे महाअवयव दान अभियान जिल्ह्यात यशस्वीरीत्या राबविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सोमवारी दिल्या.
या अभियानाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी बैठक घेण्यात आली.
३० आॅगस्टला बिंदू चौकातून सकाळी नऊ वाजता जनजागृती महाअवयव दान अभियानांतर्गंत रॅली निघणार आहे. या रॅलीत समाजातील सर्व घटक सहभागी होतील, तसेच तालुका स्तरावरही रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील महाविद्यालय स्तरांवर वक्तृत्व, रांगोळी, वाद-विवाद, निबंध, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानाच्या यशस्वितेसाठी मेडिकल कॉलेज, एनएसएस, नर्सिंग कॉलेज, सामाजिक संस्थांचा सहभाग घ्यावा. अवयव दानाबाबत जनजागृती करण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी दिल्या. यावेळी डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. एल. एस. पाटील, डॉ. अरुण वाडेकर, डॉ. प्रवीण हेंद्रे, डॉ. व्ही. ए. देशमुख, आदी उपस्थित होते.

Web Title: Still 'dal'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.