औषधांचा साठा जप्त
By admin | Published: August 24, 2016 12:18 AM2016-08-24T00:18:20+5:302016-08-24T00:24:00+5:30
वाई हत्याकांड : घोटवडेकर रुग्णालयाची कसून तपासणी; फार्म हाऊसचीही घेतली पुन्हा झडती
वाई : कोल्ड ब्लडेड सीरियल किलर संतोष पोळच्या धक्कादायक खून सत्रात गाजत असलेल्या वाईच्या घोटवडेकर हॉस्पिटलची मंगळवारी सलग पाच तास पोलिसांनी कसून चौकशी केली. पंचनाम्यात आढळून आलेल्या अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्तही करण्यात आल्या असून, यात काही वैद्यकीय फायली आणि औषधांचा साठा आहे.
पोलिसांनी दुपारी सर्वप्रथम संतोष पोळ व ज्योती मांढरेला पुन्हा धोम येथील फार्म हाऊसवर नेऊन तपासणी केली़ त्यानंतर हे पथक पुन्हा वाईत आले. सायंकाळी चार ते रात्री उशिरापर्यंत या रुग्णालयातील संशयास्पद वस्तूंचा पंचनामा करण्यात आला.
हे रुग्णालय पहिल्यापासूनच चर्चेत असून, प्रकरण उघडकीस आल्यापासून दुसऱ्यांदा पोलिसांनी या ठिकाणी चौकशी केली आहे. हे रुग्णालय संतोष पोळने केलेल्या खून सत्राचे केंद्रबिंदू ठरले आहे. त्यामुळे पोलिसांनी मंगळवारी दुपारी संतोष आणि ज्योती या दोघांनाही घेऊन घोटवडेकर रुग्णालयाची तपासणी केली.
यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात संशयास्पद औषधांचा साठा सापडला. तसेच ‘संचित’ अतिदक्षता विभागातही पोलिसांनी कसून तपासणी केली असून, हा विभाग
सील करण्याच्या दृष्टीने पोलिस चाचपणीही करत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच वाई पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मिळून पंधरा जणांचे पथक मंगळवारी सायंकाळी चार वाजता वाईतील घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील वाई पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. हॉस्पिटल, अतिदक्षता विभाग व मेडिकल स्टोअरची पोलिसांनी कसून तपासणी केली़ ही तपासणी सुरू असताना परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी झाली होती़
गूढ उकलणार !
घोटवडेकर रुग्णालयामध्ये वॉर्डबॉयचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्या अनुषंगानेही पोलिसांनी तपास सुरू केला असून, फार पूर्वीपासून रुग्णालयात असणारी काही महत्त्वाची कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यामुळे वॉर्डबॉयच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.
रुग्णवाहिका वाई ठाण्यात
संतोष पोळने विविध गुन्ह्यांत वापरलेली व तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी रुग्णवाहिका आठ दिवसांपूर्वी मुंबई येथे पोलिसांनी जप्त केली होती. ही रुग्णवाहिका हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाई पोलिस ठाण्यात मंगळवारी आणण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेने संतोष पोळला वाई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र, वाईमध्ये आरोपींना ठेवण्यासाठी सध्या जागा नसल्याने सर्व आरोपींना साताऱ्यातच ठेवले जाते. त्यामुळे संतोष पोळलाही साताऱ्यातच कोठडीत ठेवले जाईल. - विनायक वेताळ, पोलिस निरीक्षक, वाई