अभियांत्रिकी विद्यार्थ्याकडून चोऱ्या
By admin | Published: June 24, 2016 12:24 AM2016-06-24T00:24:29+5:302016-06-24T00:48:08+5:30
शिक्षणासाठी कृत्य : पुणे, सातारा येथील नऊ दुचाकी जप्त
चंदगड : अभियांत्रिकीमधील उच्च शिक्षण घेण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या एका तरुणाला चंदगड पोलिसांनी गुरुवारी अटक केली. श्रावण मायाप्पा पाटील (वय २१) असे त्याचे नाव असून, तो म्हाळेवाडी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील रहिवासी आहे. त्याने पुणे व सातारा येथून तीन बुलेट, पाच बजाज पल्सर, एक टीव्हीएस आप्पाची अशा एकूण नऊ दुचाकी गाड्या चोरी केल्या आहेत.
चंदगड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी बनावट, फॅन्सी व विनानंबर प्लेट गाड्यांच्या तपासणीसाठी मोहीम राबविली होती. यामध्ये एक मोटारसायकल सापडली आणि चंदगड पोलिसांनी दोन दिवसांतच मुख्य चोरट्याला जेरबंद केले.
याबाबत अधिक माहिती अशी, श्रावणने मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे सरकारी पॉलिटेक्निमधून इलेक्ट्रिकल डिप्लोमा केला. त्याला इलेक्ट्रिकलमधून बी.ई. करायची होते; पण घरची परिस्थिती बेताची असल्याने तो विचार सोडून नोकरीच्या शोधात लागला. त्याने प्रथम प्लॅस इलेक्ट्रॉनिक्स पुणे व नंतर वॅरा लायटिंग सिस्टीम येथे वर्षभर नोकरी केली; पण त्याने बी.ई. करण्याची आशा सोडली नव्हती. २०१५ मध्ये युनिव्हर्सल कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणे येथे बी.ई.च्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला.
बी.ई.च्या एका वर्षाला शिक्षणासाठी ७८ हजार रुपये, जेवण, कपडे, खोली भाडे, पुस्तके, प्रवास यासाठी दरमहा दहा हजार लागत होते. पण, घरातून पैसे मिळत नसल्याने त्याने चोरीचा मार्ग पत्करला. आॅगस्ट २०१५ मध्ये श्रावणने क्रिस्टेन स्कूल आॅफ इंजिनिअरिंग हडपसर पुणे येथील कॉलेज समोरून नकली चावीने बजाज पल्सर गाडीची चोरी केली. त्यानंतर कॉलेजला सुटी पडल्यामुळे गावी येत असताना सातारा येथे उतरून मोरया हॉस्पिटलच्या समोरील गुरुशिल्प बिल्डिंग आवारातून पुन्हा एक बजाज पल्सर गाडी चोरली.
पुणे येथील गणेश गार्डन अपार्टमेंटच्या पार्किंगमधून एक पल्सर, वडगाव हायवे, नवले ब्रीज, जुना टोलनाका येथे रस्त्याकडेला लावलेली पल्सर, एस.के. अपार्मेंट नऱ्हे पुणे येथून एक टी.व्ही.एस. आप्पाची गाडी, महाराष्ट्र बँकेजवळील पार्किंगमधून बजाज पल्सर, शाईल अपार्टमेंट पार्किंगमधून काळ्या रंगाची बुलेट, आनंद पार्क सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पार्किंगमधून पांढऱ्या रंगाची बुलेट, प्रतीक गृहनिर्माण संस्था सहयोगनगर येथून काळ्या रंगाची बुलेट अशा एकूण नऊ दुचाकी चोरल्या आहेत.
चंदगड तालुक्यात बऱ्याच लोकांनी कागदपत्रे नसलेल्या गाड्या खरेदी केलेल्या आहेत. अशा लोकांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच कांही लोक अजूनही जुनी गाडी खरेदी करताना कागदपत्रे पाहत नाहीत. ज्या गाड्यांची कागदपत्रे असतील अशा गाड्याच खरेदी कराव्यात, असे आवाहन पोलिस निरीक्षक महावीर सकळे यांनी केले आहे. पोलिस निरीक्षक महावीर सकळे, उपनिरीक्षक शरद माळी व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)
चोरलेल्या मोटारसायकल चंदगड तालुक्यात विकल्या
श्रावणने चोरलेल्या गाड्या दिवसा बिनधास्तपणे आणून चंदगड तालुक्यातील हलकर्णी, तांबूळवाडी, माणगाव, निट्टूर या गावांतील लोकांना विकल्या. गाड्या विकताना लोकांना संशय येऊ नये म्हणून गाडी मित्राची आहे, पण त्याला इंजिनिअरिंगची फी भरायची आहे असे सांगून गाड्यांचा सौदा करायचा. गाडी घेणाऱ्याने गाडीच्या कागदपत्रांची मागणी केल्यास ठरलेल्या रकमेतील निम्मे पैसे द्या उर्वरित पैसे कागदपत्रे दिल्यानंतर द्या, असे सांगितल्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसायचा.