चोरीचा आठ कोटींचा मुद्देमाल परत, कोल्हापूर पोलिस राज्यात आघाडीवर असल्याचा पोलिस अधीक्षकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 03:28 PM2023-01-18T15:28:43+5:302023-01-18T15:29:38+5:30

गुन्ह्यांची उकल करण्यासह चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लक्षणीय कामगिरी केली.

Stolen goods worth eight crores returned, Superintendent of Police claims that Kolhapur Police is leading in the state | चोरीचा आठ कोटींचा मुद्देमाल परत, कोल्हापूर पोलिस राज्यात आघाडीवर असल्याचा पोलिस अधीक्षकांचा दावा

संग्रहीत फोटो

Next

कोल्हापूर : गेल्या वर्षभरात चोरट्यांनी घरफोड्या आणि वाहन चोरीच्या घटनांमधून कोट्यवधी रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. चोरीच्या १७७९ गुन्ह्यांपैकी ४८४ घटनांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून, त्यातील आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत मिळाला. गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण कमी असले तरी, चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळवण्यात कोल्हापूरपोलिस राज्यात आघाडीवर असल्याचा दावा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केला आहे.

जिल्ह्यात घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गतवर्षी कमालीची वाढ झाली. सन २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये घरफोडीचे गुन्हे ३१ टक्क्यांनी वाढले, तर वाहन चोरीचे गुन्हे ३८ टक्क्यांनी वाढले. या गुन्ह्यांमधून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने आणि किमती वस्तू असा कोट्यवधी रुपयांचा ऐवज लंपास झाला. चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळणार का? याची चिंता नागरिकांना असतेच. मात्र, गेल्या वर्षभरात पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेऊन सुमारे आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आणि न्यायालयाच्या आदेशाने तो मूळ मालकांना परत केला. यामुळे चोरीची नोंद केलेल्या फिर्यादींना काहीसा दिलासा मिळाला.

दीड कोटींचे दागिने परत

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांनी १५६ घरफोड्या आणि चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करून चोरट्यांकडून सोने आणि चांदीचे दागिने हस्तगत केले. तसेच २७ लाखांची रोख रक्कमही परत मिळवली. न्यायालयाच्या आदेशानुसार रोख रकमेसह सुमारे दीड कोटी रुपयांचे दागिने मूळ मालकांना परत करण्यात आले.

४२ लाखांचे मोबाइल मिळाले

गेल्या वर्षभरात चोरीचे मोबाइल शोधण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. त्या पथकाद्वारे ४२ लाख रुपये किमतीचे ४०० पेक्षा जास्त मोबाइल शोधण्यात आले. सर्व मोबाइल मूळ मालकांना परत केले आहेत.

१९० वाहने मिळाली

गतवर्षी जिल्ह्यातून ८८३ वाहनांची चोरी झाली. त्यापैकी १९० वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. अंदाजे दोन कोटी रुपये किमतीची वाहने मूळ मालकांना परत केल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

एलसीबीची आघाडी

गुन्ह्यांची उकल करण्यासह चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लक्षणीय कामगिरी केली. गेल्या वर्षभरात एलसीबीने चोरी आणि घरफोडीचे ७७ गुन्हे उघडकीस आणून एक कोटी ४४ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. वाहन चोरीच्या ७८ गुन्ह्यांची उकल करून ती वाहने मूळ मालकांना परत केली.

चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाला तर नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढतो. त्या अनुषंगाने गुन्ह्यांची उकल वाढवण्यासह चोरट्यांकडून मुद्देमाल हस्तगत करण्यावर भर दिला जात आहे. गेल्या वर्षभरात सुमारे आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत करून कोल्हापूर पोलिसांनी राज्यात लक्षणीय कामगिरी केली. - शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक

Web Title: Stolen goods worth eight crores returned, Superintendent of Police claims that Kolhapur Police is leading in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.