कोल्हापुरात रात्रीत सहा ठिकाणी चोरी
By admin | Published: January 30, 2017 12:41 AM2017-01-30T00:41:30+5:302017-01-30T00:41:30+5:30
लाखोंचा ऐवज लंपास; तीन दुकाने, तीन घरे फोडली
फुलेवाडी : कोल्हापूर शहरातील बोंद्रेनगर, गणेश पार्क व शिंगणापूर फाटा (खांडसरी) येथील तीन दुकाने व तीन घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. एकाच रात्रीत सहा ठिकाणी चोरी झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.
बोंद्रेनगर येथील नीलेश वसंतराव देसाई यांच्या घरी व त्यांच्याच बिल्डिंगमध्ये भाड्याने असलेले सुशांत जयसिंग पोवार (रा. पाचवा स्टॉप, फुलेवाडी) यांच्या श्री ज्वेलर्सचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज, तर नीलेश देसाई यांच्या घरातील काही किमती वस्तूंवर डल्ला मारला. त्याचबरोबर गणेश पार्क येथील संजय चंद्रकांत मानकर व युवराज सर्जेराव चौगले यांच्याही घरांचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला.
याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नीलेश वसंतराव देसाई हे फुलेवाडी-रिंगरोडलगत बोंद्रेनगर येथे राहतात. ते गेल्या आठ-दहा दिवसांपासून आपल्या तीनच्या सुमारास त्यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून मोबाईल व काही किमती साहित्य लंपास केले. ते घरी आल्यानंतरच नेमके किती व कोणते साहित्य चोरीला गेल्याचे उघड होईल. त्यांच्याच बिल्डिंगमध्ये सुशांत जयसिंग पोवार यांचे श्री ज्वेलर्स हे दागिन्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाचाही कडी-कोयंडा उचकटून दुकानातील तिजोरी व शोकेसमध्ये ठेवलेले ८३ ग्रॅम सोन्याचे व सुमारे एक किलो चांदीचे दागिने असा अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शिंगणापूर फाटा (खांडसरी) येथील विष्णू पाटील यांचे शक्ती आइस्क्रीम पार्लर व प्रशांत लोहार यांच्या पृथ्वी आॅप्टिकल या दुकानांचे पत्रे फोडून दुकानातील साहित्याची नासधूस केली. शक्ती आइस्क्रीम पार्लरमधील फ्रीज बंद केल्याने त्यांचे आइस्क्रीम वितळून सहा हजार रुपयांचे नुकसान झाले. चोरट्यांनी प्रत्येक घरातील प्रापंचिक साहित्य मोठ्या प्रमाणात विस्कटले होते.
रात्री तीनच्या सुमारास बोंद्रेनगर चौकातील रस्त्यावरील विद्युत खांबावरील वीज दिवा फोडताना चोरटे सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यात कैद झाले असण्याची शक्यता पडताळली जात आहे. यावेळी आवाजाने नागरिक जागे झाल्याने चोरट्यांनी पळ काढला.