वास्तुकलेचा अप्रतिम नमुना, अंंबाबाई मंदिरातील दगडी झुंबर आले प्रकाशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 03:19 PM2021-12-10T15:19:01+5:302021-12-10T15:23:54+5:30
कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराच्या छतावरील लोखंडी गज गुरुवारी काढून टाकण्यात आले. त्यामुळे गेली कित्येक वर्षे झाकोळले गेलेले दगडी झुंबर प्रकाशात आले आहे.
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या छताला लावण्यात आलेले ३ टन वजनाचे लोखंडी गज गुरुवारी काढून टाकण्यात आले, त्यामुळे मंदिराच्या मूळ ढाच्यातच असलेले व वास्तुकलेचा सुंदर नमुना असलेले ६ फूट रुंद व ५ फूट उंच असलेले दगडी झुंबर पहिल्यांदा प्रकाशात आले आहे. या झुंबरचे सौंदर्य दिसावे यासाठी स्वतंत्र विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रशासक जिल्हाधिकारी राहुल रेखावार व सचिव शिवराज नाईकवाडे यांनी मुळे मंदिराच्या जतन संवर्धनाचे काम हाती घेतले असून, याअंतर्गत मंदिराच्या सौंदर्याला व बांधकामाला बाधा ठरणाऱ्या बाबी काढून टाकल्या जात आहेत. अंबाबाई मंदिरात पूर्वी काचेचे झुंबर होते, ते लावण्यासाठी ३ टनांचे लोखंडी गज छतावर बसवण्यात आले होते. हे गज उतरवण्यासाठी पॉप्युलर स्टील वर्क्सच्या वतीने मोफत सेवा देण्यात आली. हे गज काढल्यावर जे दिसलं ते वास्तुकलेचा अप्रतिम आहे. अंबाबाई मंदिराच्या मूळ बांधणीतच छताला ६ फूट रुंद व पाच फूट उंचीचे दगडी झुंबर साकारण्यात आले आहे. इतके दिवस लोखंडी गजामुळे झाकलेे गेलेले हे झुंबर गुरुवारी प्रकाशात आले.
वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या झुंबरावर अतिशय बारीक कोरीवकाम व नक्षीकाम आहे. त्याचे सौंदर्य भाविकांना दिसावे यासाठी स्वतंत्र विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे.