Kolhapur- विशाळगडावर दगडफेक, जाळपोळ; अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 11:47 AM2024-07-15T11:47:18+5:302024-07-15T11:47:54+5:30

एका पोलिसासह तिघे जखमी, आजपासून अतिक्रमण हटवणार : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Stone pelting, arson, Vishalgad encroachment liberation campaign takes a violent turn | Kolhapur- विशाळगडावर दगडफेक, जाळपोळ; अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण

Kolhapur- विशाळगडावर दगडफेक, जाळपोळ; अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण

कोल्हापूर/आंबा: विशाळगड अतिक्रमण मुक्तीच्या मोहिमेला रविवारी (दि. १४) हिंसक वळण लागले. राज्यभरातून आलेल्या गडप्रेमींनी गडावरील प्रार्थनास्थळावर काही घरांवर दगडफेक केली. तर गडाच्या पायथ्यासह गजापूर आणि मुस्लीमवाडी येथील घरांची, वाहनांची तोडफोड केली. काही घरांची जाळपोळही झाली. माजी खासदार संभाजीराजे यांनी मोबाइलवरून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यानंतर सोमवारपासून (दि. १५) तातडीने अतिक्रमणे हटवली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दरम्यान, तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या संशयितांवर शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

विशाळगडावर १४८ अतिक्रमणे आहेत, तर गडाच्या पायथ्याला ४२ अतिक्रमणे आहेत. सर्व अतिक्रमणे हटवून गडाचे संरक्षण करावे, असा आग्रह माजी खासदार संभाजीराजे यांनी धरला होता. जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी गेल्या आठवड्यात महाआरती करून या मुद्याकडे लक्ष वेधले. त्यानंतर पुणे येथील हिंदू बांधव समितीचे संस्थापक रवींद्र पडवळ यांनी गडप्रेमींसह रविवारी विशाळगडावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

संभाजीराजे यांनीही गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ५०० ते ६०० तरुण विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचले. पोलिसांची नजर चुकवून गडावर गेलेल्या २५ ते ३० जणांनी मशिदीच्या दिशेने धाव घेऊन दगडफेक केली. पोलिसांनी अटकाव करून तरुणांना पिटाळले. घोषणाबाजी आणि दगडफेकीने गडावर प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, दुपारी एकच्या सुमारास विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचलेले माजी खा. संभाजीराजे यांना पोलिसांनी गडावर जाण्यास अटकाव केला. काही स्थानिकांनी गडप्रेमींना धाक दाखवून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या गडप्रेमींनी बंद घरांना लक्ष्य केले. गजापूर आणि मुस्लीमवाडी येथील काही घरांवर एका प्रार्थनास्थळावर दगडफेक केली. वाहने उचकटून नुकसान केले. मुस्लीमवाडी येथील दोन घरांसह एका हॉटेलची जाळपोळ केली. दुपारी चारपर्यंत माणोली ते विशाळगडपर्यंत प्रचंड दहशतीचे वातावरण होते.

संभाजीराजेंशी चर्चा

विशाळगडावरील परिस्थिती चिघळल्याचे समजताच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गडाकडे धाव घेऊन संभाजीराजेंशी चर्चा केली. गडावर जाण्याचा आग्रह धरू नये, अशी विनंती त्यांनी गडप्रेमींना केली. संभाजीराजे यांनी अतिक्रमाणांबद्दल जाब विचारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तातडीने सोमवारपासून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करीत असल्याची ग्वाही दिली. यामुळे चारच्या सुमारास संभाजीराजे गडाच्या पायथ्यावरून परतले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने अतिक्रमणे हटवण्याचे काम सुरू व्हावे, अन्यथा गडप्रेमींचा संताप आणखी वाढेल, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला.

हल्लेखोरांवर कारवाई होणार

घरे आणि प्रार्थनास्थळांवर दगडफेक करणाऱ्या संशयितांवर शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सीसीटीव्ही फुटेजवरून संशयितांची ओळख पटवली जात आहे. लवकरच त्यांची धरपकड सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गडाकडे जाऊन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याशी चर्चा केली.

स्थानिकांनी हल्ला केला?

गडावर पोहोचलेल्या तरुणांवर स्थानिकांनी तलवारीने हल्ला केल्याचा आरोप गडप्रेमींनी केला. बंदोबस्तावरील एका पोलिसालाही तलवार लागली. पोलिसासह दोन तरुणांवर आंबा येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले.

सात जखमी

याकूब मोहमंद प्रभूळकर (वय ४५, रा. गजापूर, ता. शाहूवाडी), अर्जुन जयसिंग सिद (३०, रा. पारगाव, ता. हातकणंगले), हणमंत वसंत जाधव (२५, रा. इस्लामपूर, ता. वाळवा), साईराज आडसुळे (२१, रा. पुणे), प्रसाद संतोष रोकडे (२१, रा. शिरुर, पुणे), मयूरी राजिवडे (२६, रा. पुणे) आणि धनश्री संजय मोहरे (१८, रा. तळेगाव दाभाडे) हे सात जण जखमी झाले.
 

घटनाक्रम

स. ८ वा. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रांताधिकारी समीर शिंगोटे, तहसीलदार रामलिंग चव्हाण गडावर पोहोचले. ८:३० वा. सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील यांच्यासह वनरक्षकही बंदोबस्तासाठी पोहोचले.
९ वा. मुस्लीमवाडी येथे तरुणांनी चिकनचे दुकान फोडले
९:३० वा. दीड हजारांवर गडप्रेमींचा लोंढा पायथ्याला पोहोचला. त्यांनी बॅरिकेट तोडून लोखंडी पुलावर धाव घेतली. पोलिसांकडून लाठीचार्ज.
९:४० वा. पोलिसांची नजर चुकवून गडावर गेलेल्या तरुणांनी दर्ग्यावर दगड भिरकावले. पोलिसांकडून लाठीचार्ज. काही तरुण किरकोळ जखमी.
११ वा. गडापासून मागे पाच किलोमीटर अंतरावर साईनाथ पेठ येथे पोलिसांनी वाहनांचे ताफे अडवले. भर पावसात घोषणा देत शिवभक्तांची पायथ्याकडे धाव.
स.११ ते १२ या वेळेत गडावर जाणारे तरुण आणि पोलिसांमध्ये हुज्जत. पोलिसांच्या निषेधार्थ घोषणाबाजी.
१२ वा. पोलिसांकडून गडप्रेमींना पिटाळण्याचा प्रयत्न
१२:२५ वा. गडप्रेमींकडून पायथ्याच्या अतिक्रमणांची तोडफोड सुरू. पोलिसांकडून अटकाव.
१:४० वा. गडप्रेमींनी मागे फिरून मुस्लीमवाडी येथील दुकानांवर, घरांवर हल्ला चढवला. गॅस सिलिंडर पेटवून हॉटेलला आग लावली.
१:४५ वा. माजी खासदार संभाजीराजे दीड हजारांवर जमावासह पायथ्याला दाखल. निर्णय जाहीर करा, तरच पायथा सोडण्याचा निर्धार.
२:१० वा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची गडप्रेमींशी चर्चा. एक तासभर मंत्रालयाशी चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय संभाजीराजे यांना कळवला.
२:३० वा. अधिकारी आणि पोलिसांसमोरच तरुणांनी पायथ्याची अतिक्रमणे फोडली.
३:२५ वा. प्रशासन उद्या अतिक्रमण काढत असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी करताच जमावाने विशाळगड मुक्तीचा नारा दिला.
४ वा. गडप्रेमी परतू लागले.

विशाळगडप्रकरणी निर्माण झालेले प्रश्न -

  • गेले दीड वर्षे संभाजीराजे विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचा आग्रह धरत असताना प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष का केले?
  • ज्या अतिक्रमणाबाबत न्यायालयाचे काहीच आदेश नसतील तर अशी अतिक्रमणे काढण्यात काय अडचणी होत्या?
  • संभाजीराजे यांनी शिवभक्तांना गडावर येण्याचे आवाहन केल्यानंतरही प्रशासनाने ही बाब गांभीर्याने का घेतली नाही?
  • संभाजीराजे चर्चा करण्यास नकार दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ही बाब गृह विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती का?
  • गृह विभागाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याशी संवाद साधून संभाजीराजेशीं चर्चा घडवून आणण्यात का पुढाकार घेतला नाही?
  • एरव्ही साधे शिष्टमंडळ जरी आले तरी अधिकाऱ्यांच्या बैठका घेणारे पालकमंत्री यांनी या प्रकरणात समेट घडविण्याचे प्रयत्न का केले नाहीत?
  • विशाळगडावर कडेकोट पोलिस बंदोबस्त लावला होता, तर मग चाळीस ते पन्नास कार्यकर्ते गडावर पोहोचलेच कसे?
  • शिवभक्तांना गडावर जाण्यापासून रोखण्यासाठी ठिकठिकाणी चेकपोस्ट का उभी केली नाहीत?
  • दंगल घडण्याची शक्यता असल्याचे बोलले जात असताना पोलिसांना त्याचा थांगपत्ता कसा लागला नाही?
  •  जी अतिक्रमणे सोमवारपासून काढली जाणार आहेत, ती आधीच का काढली नाहीत, त्याबाबत दबाव होता का?

शिवभक्तांचा आक्रोश काय होता ते सरकारला आज कळाले. आता परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे लक्षात आल्यानंतर आज, सोमवारपासून अतिक्रमणे काढण्याच्या सूचना दिल्या. सरकारने यापूर्वीच निर्णय घेतला असता तर आजची घटना टळली असती - संभाजीराजे छत्रपती

Web Title: Stone pelting, arson, Vishalgad encroachment liberation campaign takes a violent turn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.