रामानंदनगर ओढ्यालगत 'आप'चा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:17 AM2021-07-20T04:17:43+5:302021-07-20T04:17:43+5:30
कोल्हापूर : रामानंदनगर परिसरातील ओढ्याचे पाणी घरांमध्ये शिरत असून महानगरपालिका प्रशासनाने त्याचा काहीच बंदोबस्त न केल्यामुळे सोमवारी 'आप'ने ...
कोल्हापूर : रामानंदनगर परिसरातील ओढ्याचे पाणी घरांमध्ये शिरत असून महानगरपालिका प्रशासनाने त्याचा काहीच बंदोबस्त न केल्यामुळे सोमवारी 'आप'ने केला रास्ता रोको केला. येत्या १५ दिवसांत प्रश्न सोडविला नाही तर ओढ्यातील पाणी घेऊन महापालिकेवर बादली मोर्चा काढू, असा इशारा 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिला.
रामानंदनगरमधील जाधव पार्क येथील नाल्यात असलेल्या बंधाऱ्यामुळे दरवर्षी येथील आजूबाजूच्या २५० घरांमध्ये पुराचे पाणी शिरते तसेच नाल्यात असलेल्या गुंजन पॅराडाईज या अपार्टमेंटच्या अनधिकृत बांधकामामुळे पाणी योग्य पद्धतीने निचरा होत नाही. जाधव पार्कमागील नाल्यातील बंधारा हटवून नाल्यातील पाण्याला वाट मोकळी करून दिल्यास पुराचे पाणी घरांमध्ये शिरणार नाही. त्यामुळे बंधारा हटवून पाण्यास वाट मोकळी करून द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत होती.
गुंजन पॅराडाईज अपार्टमेंटने अनधिकृत बांधकाम करून भिंत बांधली आहे. यासंबंधी आयुक्तांचे आदेश असूनदेखील भिंत हटविली गेलेली नाही. संबंधित भिंत त्वरित हटवून नाल्यातील अतिक्रमण काढावे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली होती. वर्षभरापूर्वी आयुक्तांनी अतिक्रमणस्थळी भेट देऊन भिंत पाडण्याचे आदेश दिले होते परंतु यावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्यामुळे आज परिसरातील नागरिकांना घेऊन 'आप'ने रामानंदनगर येथील पुलावर रास्ता रोको केला.
सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या रास्ता रोकोची दखल घेत महापालिकेचे अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. संबंधित अतिक्रमणावर कारवाई करू, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी युवाध्यक्ष उत्तम पाटील, राज कोरगावकर, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, अमरजा पाटील, अश्विनी गुरव, उज्ज्वला भोसले, प्रेम बनगे, तुषार पाटील, व्यंकटेश दासार, सतीश भाले, आदम शेख, रविराज पाटील, गिरीश पाटील, विशाल वठारे, राकेश गायकवाड, विजय भोसले, विजय हेगडे, महेश घोलपे उपस्थित होते.
फोटो क्रमांक - १९०७२०२१-कोल-रामानंदनगर
ओळ - कोल्हापुरातील रामानंदनगर येथील ओढ्याचे पाणी घरांमध्ये शिरत असून महानगरपालिका प्रशासनाने काहीच कार्यवाही न केल्यामुळे सोमवारी 'आप'ने केला रास्ता रोको केला.