शाहूवाडीतील बॉक्साईट उत्खनन बंद
By admin | Published: November 1, 2015 12:39 AM2015-11-01T00:39:02+5:302015-11-01T00:58:33+5:30
दराचा प्रश्न : ट्रकमालक-हिंडाल्कोतील वाद
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील ट्रकमालक व हिंडाल्को कंपनीचे प्रशासन यांच्यात बॉक्साईटच्या दराबाबतच्या वादात उत्खनन बंद आहे. संपूर्ण पावसाळा बॉक्साईटचे उत्खनन सुरू झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील ४00 ट्रकमालक अडचणीत आले असून हिंडाल्को कंपनीच्या प्रशासनाच्या मनमानी कारभाराबाबत ट्रकमालकांमध्ये असंतोष पसरला आहे.
शाहूवाडी तालुक्यात २000 सालापासून बॉक्साईट उत्खनन सुरू आहे. सध्या ऐनवाडी, धनगरवाडी, गिरगाव येथे बॉक्साईटचे उत्खनन सुरू आहे. तालुक्यातील ४00 ट्रकमालक दररोज बॉक्साईट खनिजांची वाहतूक करीत असतात. या व्यवसायावर अनेक बेरोजगार, हॉटेल, धाबा, पेट्रोल पंप, टायर दुकान, चहागाडी, आदी व्यवसाय अवलंबून आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून ऐनवाडी, धनगरवाडी येथे हिंडाल्को कंपनी बॉक्साईट उत्खनन करीत आहे. गेल्यावर्षी या कंपनीने ट्रकमालकांना शाहूवाडी ते बेळगाव वाहतूक करण्यासाठी टनाला ९५४ रुपये दर दिला होता.
मात्र, चालू वर्षी कंपनी ९0४ रुपये दर देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, ट्रकमालकांना टनाला ५0 रुपये कमी दर मिळाल्यामुळे त्यांचा तोटा होणार आहे. गेले एक महिना कंपनीचे प्रशासन व ट्रकमालक यांच्यात वाद सुरू आहे. (प्रतिनिधी)