दिशाभूल थांबवा, थकीत घरफाळा कधी भरणार ते सांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:24 AM2021-03-08T04:24:29+5:302021-03-08T04:24:29+5:30
धनंजय महाडिक यांचे पुन्हा आव्हान लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील डीवायपी सिटी मॉलमधील भाड्याने दिलेल्या मिळकती स्वतःच्या वापरात ...
धनंजय महाडिक यांचे पुन्हा आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील डीवायपी सिटी मॉलमधील भाड्याने दिलेल्या मिळकती स्वतःच्या वापरात दाखवून पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी महापालिकेचा करोडो रुपयांचा घरफाळा बुडविला आहे. हा जुना विषय असल्याचे ते सांगत आहेत; पण २०१४ ते २०२१ या कालावधीतील सुमारे १५ कोटी रुपयांचा घरफाळा कधी भरणार, हे जाहीर करून त्यांनी जुना विषय संपवावा, असे आव्हान माजी खासदार व भाजपचे प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी रविवारी पुन्हा दिले.
महापालिका प्रशासनाने संबंधितांकडून घरफाळा वसुली करावी, अन्यथा आयुक्त, उपायुक्त आणि कर निर्धारक यांना उच्च न्यायालयात खेचले जाईल, असेही महाडिक यांनी म्हटले आहे. महाडिक प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हणतात, बगलबच्चांना पुढे करून मूळ विषयाला बगल देऊ नये. त्यांची हुजरेगिरी करणारे काहीजण पत्रकार परिषद घेऊन, धादांत खोटे बोलत आहेत. महापालिका प्रशासनावर खापर फोडून स्वतःचा बचाव करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महापालिकेने २४ ऑक्टोबर २०१४ ला डी. वाय. पाटील हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांना पत्र लिहून माहिती सादर करण्याबाबत कळविले. त्यानंतर १८ ऑक्टोबर २०१९ ला पुन्हा पत्र पाठवून मिळकतीमधील भाडेवापर माहिती आणि करारपत्र सादर करण्याबाबत कळविले. पालकमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांनी महानगरपालिकेला कसलीही माहिती दिलेली नाही. घरफाळा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर पालकमंत्र्यांकडून मूळ विषयाला बगल देऊन दिशाभूल केली जात आहे. त्यासाठी त्यांनी केलेले आरोप हास्यास्पद आहेत. महापालिका प्रशासनावर दबाव टाकून घरफाळा बुडविणाऱ्यांनी सज्जन असल्याचा आव आणू नये. आम्ही आमची जी काही शासकीय करांची रक्कम आहे, त्याची पूर्तता करत असतो; पण पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे. त्याबद्दल बोलण्याऐवजी हा जुना विषय आहे असे सांगून ते आमच्याबद्दल राजकीय द्वेषातून बिनबुडाचे आरोप करत आहेत.