बेताल आरोप थांबवा... अन्यथा मानहानीचा दावा
By admin | Published: August 7, 2015 11:33 PM2015-08-07T23:33:45+5:302015-08-07T23:33:45+5:30
गडहिंग्लज नगरपालिका : उपनगराध्यक्षांना सत्ताधाऱ्यांचा इशारा
गडहिंग्लज : फुकट प्रसिद्धीसाठी कोणतीही शहानिशा न करता बेताल आरोप करणे थांबवा. अन्यथा, प्रतिष्ठित नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या मानहानीबद्दल योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा सत्ताधारी जनता दल-जनसुराज्य-कॉंगे्रस आघाडीच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षा कावेरी चौगुलेंना प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.
पत्रकात म्हटले आहे, महिन्यापूर्वी जनता दलाच्या राजेश बोरगावे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी कामांचा सपाटा लावल्यामुळे अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षांनी त्यांचा वचपा काढण्याचा मनसुबा रचला आहे.
जनतेची गर्दी वाढल्यामुळेच खुल्या चर्चेसाठी, विकासासाठी व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगराध्यक्ष दालनाशेजारीच नागरिक व नगरसेवकांच्या बैठकीची व्यवस्था आणि उपनगराध्यक्षांची बैठक व्यवस्था पहिल्या मजल्यावरील तत्कालीन नगराध्यक्ष स्व. पेडणेकर यांनी निवडलेल्या दालनात केली आहे.
जनतेची कामे करण्याचा हेतू असल्यास कोणतेही पद आणि बैठक व्यवस्थेची गरज नाही. मात्र, विकासाच्या मुद्द्यावर काम न करता बैठक व्यवस्थेवरून उपनगराध्यक्षा राजकारण करीत आहेत, असा आरोप पत्रकातून करण्यात आला आहे. पत्रकावर, नगराध्यक्ष राजेश बोरगावे, गटनेत्या प्रा. कोरी यांच्यासह सत्ताधारी सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
...तर ५0 लाखांसाठी काय केले असते?
गेल्या नगराध्यक्ष निवडीवेळी ५० लाखांचे आमिष दाखवण्यासाठी आम्ही त्यांच्या माहेरी गेल्याचा त्यांचा हास्यास्पद आरोप आहे. तसे घडले असते, तर साध्या बैठक व्यवस्थेसाठी इतका काहूर माजविणाऱ्या उपनगराध्यक्षांनी काय-काय केले असते? असा टोमणा लगावतानाच बिनबुडाच्या आरोपाबद्दल कायदेशीर पावले उचलली जातील, असा इशारा पत्रकातून देण्यात आला आहे.
महिला असल्याचा गैरफायदा
सर्व नागरिक व नगरसेवकांना चांगली वागणूक देण्याची गडहिंग्लज पालिकेची परंपराच आहे. मात्र, महिला शब्दाचा भांडवल ‘महिला’ असल्याचा गैरफायदा उपनगराध्यक्षा उठवित आहेत, असा पत्रकात आरोप आहे.
महिलेच्या अवमानाचा विसर !
राष्ट्रवादीच्या कारकिर्दीत नगराध्यक्षपदी महिला असतानाही तत्कालीन विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी यांची बैठक व्यवस्था स्वच्छतागृहाशेजारीच केली होती. तरीदेखील त्यांनी विनातक्रार काम केले. याचा उपनगराध्यक्षांना सोयीस्कर विसर पडला आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.