गोडसाखर कामगारांचे धरणे स्थगित
By admin | Published: March 10, 2017 11:37 PM2017-03-10T23:37:59+5:302017-03-10T23:37:59+5:30
थकीत रकमा देणार : हसन मुश्रीफ यांनी दिले आंदोलकांना आश्वासन
गडहिंग्लज : ‘ब्रीसक्’ कंपनी आणि कारखाना यांच्या करारातील कलम क्रमांक ५ व १८ नुसार लवाद नेमून लवादाच्या निर्णयानुसार कामगारांच्या थकीत रकमा देण्यास कंपनीला भाग पाडण्यात येईल, अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडून मिळाल्यामुळे येथील प्रांत कचेरीसमोर गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या गोडसाखर सेवानिवृत्त कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन शुक्रवारी तात्पुरते स्थगित करण्यात आले.
हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना आर्थिक अरिष्टात सापडल्यामुळे आमदार मुश्रीफ यांच्या पुढाकाराने गत चार वर्षांपासून पुणे येथील ब्रीसक् कंपनीला सहयोग तत्त्वावर चालवायला देण्यात आला आहे.
मात्र, सेवानिवृत्त कामगारांचा अंतिम पगार, ग्रॅच्युईटी व इतर रकमा अद्याप न मिळाल्यामुळे कामगारांनी हे आंदोलन सुरू केले होते. याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी जिल्हा बँकेत शुक्रवारी संयुक्त बैठक झाली.
आमदार मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस कारखान्याचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्यासह संचालक दीपक जाधव, सतीश पाटील, अमर चव्हाण, बाळकृष्ण परीट व विद्याधर गुरबे, सेवानिवृत्त कामगार संघटनेचे चंद्रकांत बंदी, बाळासाहेब मोहिते, सुभाष पाटील, रमेश गुरव, दत्ता देसाई यांच्यासह अॅड. दशरथ दळवी, कंपनीचे कार्यकारी संचालक डॉ. एम. जी. पवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)